रस्त्यांवर गोळ्या चालाव्यात, रक्तपात व्हावा, अशी राहुल गांधींची इच्छा आहे का?; भाजपचा पलटवार
By देवेश फडके | Published: February 3, 2021 06:31 PM2021-02-03T18:31:27+5:302021-02-03T18:33:50+5:30
कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर टीका केली. राहुल गांधींनी केलेल्या या टीकेचा खरपूस समाचार घेत भारतीय जनता पक्षाने (भाजप) पलटवार केला आहे.
नवी दिल्ली : कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर टीका केली. राहुल गांधींनी केलेल्या या टीकेचा खरपूस समाचार घेत भारतीय जनता पक्षाने (भाजप) पलटवार केला आहे.
भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल गांधी यांच्या टीकेला उत्तर देत काही प्रश्न उपस्थित केले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हिंसाचार पसरवणाऱ्यांना सोडून द्यायची मागणी करत आहेत. हिंसाचार करणाऱ्या व्यक्ती राहुल गांधी यांचे नातलग आहेत का, रस्त्यांवर गोळ्या चालाव्यात, रक्तपात व्हावा, अशी राहुल गांधींची इच्छा आहे का, अशी विचारणा संबित पात्रा यांनी केली.
राहुल गांधी यांच्याकडून दिशाभूल
राहुल गांधी हे दिशाभूल करत आहेत. शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राहुल गांधी आणि काँग्रेस आपल्या राजकारण करत आहे. शेतकऱ्यांच्या माध्यमातून सामान्यांना चिथावण्याचे, भडकवण्याचे काम केले जात आहे, असा दावा संबित पात्रा यांनी यावेळी बोलताना केला.
मी शेतकऱ्यांना जाणतो, ते मागे हटणार नाहीत; सरकारलाच माघार घ्यावी लागेल : राहुल गांधी
राहुल गांधींना कृषी कायदे माहिती नाहीत
राहुल गांधी आमि रिहाना या दोघांनाही कृषी कायद्यांबाबत अजिबात माहिती नाही. दोघांनाही रब्बी पीकांबद्दल माहिती नाही. तरीही कृषी कायद्यासंदर्भात वाटेल तशी विधाने करत आहेत. कॅलिफोर्निया येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. तेव्हा यापैकी कुणीही एकही ट्विट केले नाही, अशी टीका संबित पात्रा यांनी केली.
आमचा चर्चांवर विश्वास
राहुल गांधींनी सांगितले की कोणी मागे हटणार नाही. आमचा चर्चांवर विश्वास आहे. हे शेतकऱ्यांचे आंदोलन आहे आणि आमचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. शेतकरी नेते आणि सरकार यांच्यात अजूनही चर्चा होऊ शकते, असे संबित पात्रा यांनी सांगितले.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तटबंदी तयार करण्यात आली आहे. हे शेतकऱ्यांना घाबरतात का? शेतकरी ही देशाची ताकद आहे. केंद्र सरकारचे काम शेतकऱ्यांशी चर्चा करणे आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे हे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, ऑफर टेबलवर आहे. हा कायदा दोन वर्षांसाठी थांबवला जाऊ शकतो. या समस्येचे निराकरण केले गेलं पाहिजे. मी शेतकऱ्यांना चांगले ओळखतो. ते मागे हटणार नाहीत, सरकारचा मागे हटावे लागेल, असे राहुल गांधी म्हणाले.