'राजीव गांधी हेच राहुल यांचे वडील असल्याचा पुरावा काय?'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 11:10 AM2019-03-27T11:10:46+5:302019-03-27T11:34:08+5:30
भाजपा नेते विनय कटियार यांनी विजय शंखनाद सभेत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली - भाजपा नेते विनय कटियार यांनी विजय शंखनाद सभेत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 'पुलवामा घटनेत आमचे 45 सैनिक शहीद झाले आणि आज काँग्रेस याचे पुरावे मागत आहे. तुम्ही कोणत्या गोष्टीचा पुरावा मागत आहात? जेव्हा बाळ जन्माला येतं, तेव्हाच तोच त्या बाळाचा बाप आहे, याची खात्री आईच देते. राहुल गांधींचा जेव्हा जन्म झाला तेव्हा सोनिया गांधी यांनी त्यांना राजीव गांधी तुझे वडील आहेत असं सांगितलं असेल. जर याचा पुरावा मागितला तर तुम्ही सांगू शकाल का, असा सवाल विनय कटियार यांना केला आहे. उत्तर प्रदेशमधील बस्तीमध्ये विजय शंखनाद सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्यांनी असं म्हटलं आहे.
'आपल्या गर्भातून दहशतवादाला जन्म देण्याचं एकच काम काँग्रेस पक्ष करतो. लष्कराचे जवान कोणाचेही सरकार येईल तेव्हा बुलेटप्रुफ जॅकेट मागत असतं. त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक लाख बुलेटप्रुफ जॅकेट मागवले. किमान सीमेवर लढताना सैनिकांना सुरक्षा कवच तर मिळाले. जी-जी चांगली कामे झाली ती सर्व भाजपाने केली आहेत' असं विनय कटियार यांनी म्हटलं आहे.
'ज्यांच्या खिशात पाच रूपये नव्हते. त्यांना उपचारासाठी पाच लाख रूपये देण्याचे काम मोदींनी केले आहे. देशात दहशतवाद पसरवण्याचे काम काँग्रेसने केले आहे. काँग्रेसमुळेच देशात अफझल गुरूसारखी माणसं तयार झाली. आता राहुल गांधी ती परंपरा पुढे चालवत आहेत' असंही कटियार यांनी सांगितलं. तसेच त्यांनी प्रियंका गांधी यांच्यावरही टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी - अमित शहा
पुलवामा हल्ल्यानंतर भारताकडून एअर स्ट्राईक केला गेला यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले. राहुल गांधी यांना कोणत्या प्रश्नांची उत्तरे हवीत? भारतीय हवाई दलाच्या धाडसावर एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाने प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्न नाही. राहुल गांधी यांनी देशातील जनतेची, शहीदांच्या कुटुंबियांची आणि भारतीय जवानांची माफी मागितली पाहिजे असा हल्लाबोल काही दिवसांपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राहुल गांधी यांच्यावर केला होता. भाजपा मुख्यालयात अमित शहा यांची पत्रकार परिषद घेण्यात आली त्यामध्ये ते बोलत होते.
'जेव्हा जवाहरलाल नेहरू विद्यापीठात भारताच्या विरोधात नारेबाजी होते तेव्हा काँग्रेस त्या गोष्टीला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दर्जा देते आणि पुलवामा सारख्या हल्ल्यानंतर जेव्हा एअर स्ट्राईकने उत्तर दिले जाते तेव्हा त्याचे पुरावे मागितले जातात. ही किती दुर्दैवी घटना आहे पाकिस्तान भारतात दहशतवाद पसरवत आहे' असं अमित शहा यांनी म्हटले होते. तसेच दहशतवाद्यांना उत्तर देण्याची गरज नाही काय, असा सवालही त्यांनी राहुल गांधी यांना केला होता.