भाजपाने गुजरात थोडक्यात राखले, मोदी जिंकूनही राहुल बाजीगर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 03:44 AM2017-12-19T03:44:56+5:302017-12-19T05:16:53+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे गुजरात हे राज्य राखण्यात भाजपाला कसेबसे यश मिळाले असून, हिमाचल प्रदेश मात्र काँग्रेसने आपल्या हातातून गमावले आहे. मोदींनी गुजरात जिंकले पण, काठावरचे बहुमत मिळाल्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेच बाजीगर ठरले आहेत.
अहमदाबाद/सिमला/नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे गुजरात हे राज्य राखण्यात भाजपाला कसेबसे यश मिळाले असून, हिमाचल प्रदेश मात्र काँग्रेसने आपल्या हातातून गमावले आहे. मोदींनी गुजरात
जिंकले पण, काठावरचे बहुमत मिळाल्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेच बाजीगर ठरले आहेत. गुजरातमध्ये भाजपाला १८२ पैकी जेमतेम ९९ जागा तर काँग्रेसने ८0 जागांवर यश मिळविले आहे. तिथे बहुमतासाठी ९२ जागांची गरज होती.
हिमाचल प्रदेशात मात्र काँग्रेसचे पानिपतच झाले. तेथील ६८ जागांपैकी ४४ जागा जिंकून देशातील आणखी एक राज्य भाजपाने आपल्याकडे खेचले आहे. देशातील १३ राज्यांत आता भाजपाची स्वबळावर सत्ता असेल. महाराष्ट्र, बिहार व जम्मू-काश्मीरमध्ये मित्रपक्षांसमवेत भाजपा सत्तेवर असल्याने राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे १६ राज्ये आहेत. हे घवघवीत यश मिळवताना मात्र भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल पराभूत झाले. पक्षासाठी हा मोठा धक्का असून, तिथे पक्षाला नवा नेता शोधावा लागणार आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले...परिश्रमाचा विजय-
मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना जो विकास केला त्याचे तेच चक्र माझ्यानंतरच्या मुख्यमंत्र्यांनी सुरू ठेवले. कठोर परिश्रम केलेल्या पक्ष कार्यकर्त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन. हा विजय सामान्य विजय नाही. तेथील विकासाचा प्रवास पुढे सुरू ठेवण्यासाठी सगळे प्रयत्न करू व लोकांची अथक सेवा करू.
राहुल गांधींचा असाही उदय-
गुजरात या मोदी यांच्या बालेकिल्ल्यावरच राहुल गांधी यांनी घाव घातला. दलित, अल्पसंख्याक, शेतकरी, व्यापारी आणि बेरोजगार तरुणांसाठी त्यांनी आवाज उठवला. सोशल मीडियावर मोदी व अमित शहा यांच्यावर प्रश्नांची सरबत्तीही केली. विकासाच्या मुद्द्यावर बोलतीच बंद केली. यामुळेच भाजपा शंभरीही गाठू शकली नाही. अन् काँग्रेस पराभूत होऊनही राहुल गांधी बाजीगर ठरले.
राहुल गांधी म्हणाले...लोकांचा कौल मान्य-
मी व माझा पक्ष लोकांनी दिलेला कौल मान्य करतो. दोन्ही राज्यांतील नव्या सरकारांचे अभिनंदन. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रतिस्पर्धी पक्षावर अतिशय संयमाने व सन्मानाने टीका केली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. काँग्रेसने प्रचारात कुठेही पातळी घसरू दिली नाही; किंबहुना विकासाचे मुद्दे मांडून सत्ताधा-यांची अडचण केली. असेच राजकारण पुढेही करायचे आहे.
अमित शहा म्हणाले...लोकप्रियतेचा विजय-
अमित शहा म्हणाले, भाजपाच्या बाजूने आलेले हे निकाल म्हणजे घराणेशाहीविरुद्ध विकास आणि उत्कृष्ट कामगिरीचा हा विजय आहे. गुजरातमधील विजयाचे श्रेय पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता आणि केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणाच्या कामांना आहे. जातीयवाद आणि तुष्टीकरणाच्या विरुद्ध लोकांचा कौल आहे.
सत्तास्थापनेची भाजपाची तयारी-
भाजपाने गुजरात आणि हिमाचल प्रदेशात सत्ता स्थापन करण्याची तयारी चालविली असून गुजरातसाठी अर्थमंत्री अरुण जेटली आणि महासचिव सरोज पांडे यांची तर, हिमाचल प्रदेशसाठी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण व केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गुजरातसाठी विजय रुपाणी यांचीच निवड जवळपास निश्चित आहे.
आठ निवडणुका भाजपासाठी कठीण-
गुजरात आणि हिमाचलमध्ये सत्ता मिळवण्यात यश आले असले तरी गुजरातमध्ये काँग्रेसने केलेली दमछाक बघता पुढील वर्षी आठ राज्यांमध्ये होणाºया निवडणुकांमध्ये भाजपाला कसरत करावी लागेल.