'मोदी आणि विरोधकांचं नातं भावोजी आणि मेहुणीसारखं'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 01:22 PM2018-05-24T13:22:49+5:302018-05-24T13:23:06+5:30
विरोधकांच्या एकजुटीवर निशाणा
नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये जेडीएसचे कुमारस्वामी यांनी काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला काँग्रेससह विरोधी पक्षांमधील महत्त्वाचे नेते उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीला वर्षभराचा कालावधी शिल्लक राहिला असताना, कर्नाटकमधील शपथविधी सोहळ्याच्या माध्यमातून विरोधकांनी एकजूट दाखवल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर भाजपा खासदार परेश रावल यांनी एक ट्विट करत विरोधकांवर निशाणा साधला आहे. विरोधकांपैकी कोणाचाही उल्लेख न करता मेहुणी आणि भावोजी यांच्या नात्याचा संदर्भ देत परेश रावल यांनी चिमटा काढला आहे. त्यांच्या या ट्विटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
परेश रावल यांनी ट्विटरवर एक स्क्रीनशॉट शेअर करत त्याखाली 'देख तमाशा देख' असं लिहिलं आहे. 'भावोजींना अडवण्यासाठी मेहुणी ज्याप्रकारे दारावर उभी राहते, अगदी त्याचप्रकारे मोदींना रोखण्यासाठी विरोधक उभे आहेत. मेहुणीलाही माहित असतं की भावोजी तर येणारच आहेत,' असं रावल यांनी ट्विट केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये लिहिलं आहे.
देख तमाशा देख ... pic.twitter.com/odGyGlVLyG
— Paresh Rawal (@SirPareshRawal) May 24, 2018
अभिनेते आणि खासदार असलेले परेश रावल यांनी याआधीही ट्विटरवरुन काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर शरसंधान साधलं आहे. विनोदी अभिनेते असलेले रावल अतिशय विनोदी पद्धतीनं विरोधकांची खिल्ली उडवतात. राहुल गांधींवरही त्यांनी अनेकदा विनोदी पद्धतीनं निशाणा साधला आहे.