...तोपर्यंत जनता चौकीदार चोर है म्हणणारच; शॉटगन सिन्हांचा पुन्हा मोदींवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 04:15 PM2019-01-19T16:15:39+5:302019-01-19T16:21:41+5:30
मी आधी भारतीय जनतेचा आहे, त्यानंतर भारतीय जनता पार्टीचा असल्याचं सिन्हा म्हणाले
कोलकाता: विरोधकांच्या महारॅलीला संबोधित करताना खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपाला घरचा आहेर दिला. मी आधी भारतीय जनतेचा आहे आणि मग भारतीय जनता पार्टीचा आहे, असा डायलॉग मारत त्यांनी मोदी सरकारच्या निर्णयांवर तोंडसुख घेतलं. विरोधकांची एकी शानदार असल्याचं म्हणत त्यांनी महाआघाडीतील अनेकांचं तोंडभरुन कौतुक केलं.
चौकीदार ही चोर है, या विरोधकांच्या मोदींवरील टीकेवर सिन्हा यांनी भाष्य केलं. जोपर्यंत पंतप्रधान यावर बोलणार नाहीत, तोपर्यंत चौकीदार चोर है ही टीका ऐकून घ्यावीच लागेल, असं सिन्हा म्हणाले. नोटाबंदीचा निर्णय पक्षाचा नव्हता. हा निर्णय मनमानीपणाचा नमुना होता. तो निर्णय पक्षाचा असता, तर लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशींना याची कल्पना असती. रातोरात हा निर्णय घेण्यात आला. देशवासीयांना रांगेत उभं करण्यात आलं. आपल्या माता-भगिनींनी चांगल्या हेतूनं ज्या पैशांची बचत केली, तेच पैसे बँकेत जमा करण्यासाठी त्यांना रांगा लावल्या लागल्या', अशा शब्दांमध्ये सिन्हा यांनी नोटाबंदीवरुन मोदींवर टीका केली.
Shatrughan Sinha, BJP at Opposition rally in Kolkata: Agar sach kehna baghawat hai toh samjho hum bhi baghi hain. Main sach ke saath, sidhanton se samjhouta nahi kar sakta. pic.twitter.com/hJE1Z2Mv4P
— ANI (@ANI) January 19, 2019
मोदींवर तुटून पडलेल्या सिन्हा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचं मात्र कौतुक केलं. तीन राज्यांमध्ये काँग्रेसनं मिळवलेल्या विजयाबद्दल त्यांनी राहुल यांचं अभिनंदन केलं. 'नोटाबंदीच्या धक्क्यातून जनता सावरली नसताना, राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे सरकारनं गब्बर सिंह टॅक्स लागू करण्यात आला. यातून जनतेची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी झाली,' असं म्हणत सिन्हा यांनी मोदींना लक्ष्य केलं. देशाला परिवर्तनाची गरज आहे. परिवर्तन घडवण्याचा निश्चय जनतेनं केला आहे. त्यामुळे लवकरच देशात बदल घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.