'दुष्ट, धर्मविरोधी, रामविरोधी; राहुल गांधी नव्या युगातील रावण', भाजपची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 05:58 PM2023-10-05T17:58:45+5:302023-10-05T17:59:51+5:30
भाजपने सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केले असून, यात राहुल गांधी यांना रावणाच्या रुपात दाखवले आहे.
नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक जवळ येत आहे, त्यामुळे भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दरम्यान, आज(गुरुवारी) भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची थेट रावणाशी तुलना केली. भाजपने सोशल मीडिया हँडलवर एक पोस्टर शेअर केले, ज्यात राहुल गांधी यांना रावणाच्या रुपात दाखवण्यात आले आहे.
The new age Ravan is here. He is Evil. Anti Dharma. Anti Ram. His aim is to destroy Bharat. pic.twitter.com/AwDKxJpDHB
— BJP (@BJP4India) October 5, 2023
फोटो शेअर करत भाजपने 'नव्या युगातील रावण. तो दुष्ट आहे, धर्माविरुद्ध आहे, रामाच्या विरोधात आहेत, देश नष्ट करणे, हेच त्याचे एकमेव ध्येय आहे,' असे कॅप्शनही दिले आहे. भाजपने शेएअर केलेल्या पोस्टरमध्ये भारत धोक्यात आहे, असे लिहिले आहे. तसेच, इंग्रजीत A CONGRESS PARTY PRODUCTION DIRECTED BY GEORGE SOROS, असेही लिहिले आहे.
भाजपने राहुल यांना सोरोसशी का जोडले?
काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'मध्ये जॉर्ज सोरोसचे लोक सहभागी झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. याशिवाय भाजप नेत्यांनी ‘ओपन सोसायटी फाऊंडेशन’, या स्वयंसेवी संस्थेचे नाव घेत काँग्रेसवर निशाणा साधला. भाजप नेत्यांचा दावा आहे की, या एनजीओला अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांनी निधी दिला आहे आणि त्याचे उपाध्यक्ष सलील शेट्टी काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'मध्ये सहभागी झाले होते.
जॉर्ज सोरोस यांची पीएम मोदींवर टीका
जॉर्ज सोरोस अमेरिकन अब्जाधीश आहेत. सोरोस यांनी 8 महिन्यांपूर्वी म्युनिक सुरक्षा परिषदेत म्हटले होते की, भारत हा लोकशाही देश आहे, पण पंतप्रधान मोदी लोकशाहीवादी नाहीत. ते मोठे नेते होण्याचे मुख्य कारण म्हणजे, मुस्लिमांवर केलेला हिंसाचार. सोरोस यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा, म्हणजेच CAA आणि काश्मीरमधून कलम 370 हटवण्यावरुनही पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता.
घमंडिया फाइल्स के चौथे एपिसोड में देखिए...
TMC के शासन में बंगाल में चुनाव जीतने के लिए कैसे उड़ाई जाती है लोकतंत्र की धज्जियां,
मारपीट, हत्या और बलात्कार से गांव-गांव तक फैला है ममता बनर्जी के कार्यकर्ताओं का खौफ। pic.twitter.com/w4SVm3HzY7— BJP (@BJP4India) October 5, 2023
घमंडिया फाइल्सचा चौथा भाग रिलीज
दरम्यान, भाजपने आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन 'घमांडिया फाइल्स' नावाचा चौथा एपिसोड जारी केला आहे. यात भाजपने पश्चिम बंगालमध्ये सत्तेत असलेल्या टीएमसीवर निशाणा साधला आहे. 'टीएमसीच्या राजवटीत बंगालमध्ये निवडणुका जिंकण्यासाठी लोकशाहीचे तुकडे केले जातात, मारहाण, खून आणि बलात्काराच्या माध्यमातून गावोगावी टीएमसी कार्यकर्त्यांची दहशत पसरवली जाते, अशी टीका भाजपने केली.