भाजप विरोधकांचे ‘एकला चलो रे’? काँग्रेसकडून ऐक्यासाठी पुढाकार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 06:22 AM2022-04-16T06:22:34+5:302022-04-16T06:22:34+5:30
काँग्रेस निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून सावरण्यात व्यग्र असून, इतर पक्ष ‘एकला चलो रे’ वागत असल्याने भाजपविरोधी पक्षांच्या संघटित विरोधाला सुरूंग लागताना दिसत आहे.
हरीश गुप्ता
नवी दिल्ली :
काँग्रेस निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून सावरण्यात व्यग्र असून, इतर पक्ष ‘एकला चलो रे’ वागत असल्याने भाजपविरोधी पक्षांच्या संघटित विरोधाला सुरूंग लागताना दिसत आहे. वर्षअखेर दोन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी काँग्रेसने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु काँग्रेसने संसदेच्या शेवटच्या दिवशी विरोधकांसाठी पारंपरिक भोजन आयोजित केले नाही, ना विरोधकांच्या ऐक्यासाठी कोणता पुढाकार घेतला.
काँग्रेस-भाजपेतर तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पक्ष, द्रमुक, तेलंगण राष्ट्र समिती, जनता दल (एस) किंवा एवढेच काय डावे पक्षही संसदेत एक-एकटे राहिले. सपा व बसप तृणमूलसोबत काम करण्याच्या मानसिकतेत नाही. मार्क्सवादी पक्षाने काँग्रेससोबत आघाडी न करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब विजयानंतर आम आदमी पक्ष एकट्याने चालणार आहे. राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत काम करण्याची तयार असल्याचे संकेत दिले आहेत.
प्रयत्न गेले वाया
- तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे तिसरी आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न त्यांच्यासोबत काम करण्याची इतर कोणा पक्षांची इच्छा नसल्यामुळे वाया गेले.
- काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राज्यांच्या शाखा (विशेषत: गुजरात आणि हिमाचल प्रदेश) बळकट करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या दोन्ही राज्यांत या वर्षअखेर विधानसभा निवडणूक होणार आहे.