"भारतात कुणी राजा नाही अन् कुणी राजकुमारही नाही"; भाजपाचा राहुल गांधींना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 07:14 PM2022-06-14T19:14:14+5:302022-06-14T19:15:00+5:30
भाजपाच्या संबित पात्रा यांची काँग्रेसवर सडकून टीका
National Herald Case Rahul Gandhi, Sambit Patra | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशीसाठी सलग दुसऱ्या दिवशी सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) कार्यलयात हजेरी लावली. या आधी सोमवारी राहुल गांधी यांची सुमारे आठ चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर पुढील चौकशी साठी त्यांना मंगळवारी पुन्हा हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. या मुद्द्यावरून सोमवारपासूनच राजकारण तापल्याचे दिसत आहे. काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत. तर काँग्रेसचे नेतेमंडळीदेखील शक्य त्या माध्यमातून या संदर्भात आपली नाराजी व्यक्त करत आहेत व निषेध नोंदवत आहेत. याच दरम्यान, भाजपा प्रवक्ता संबित पात्रा यांनी राहुल गांधींचे नाव न घेता काँग्रेसला आणि कार्यकर्त्यांना डिवचले आहे.
"काँग्रेसच्या नेतेमंडळींचा असा समज आहे की आम्ही या देशातील सर्वात पहिला परिवार आहोत. त्यामुळे आमच्यावर केस कशी केली जाऊ शकतं? आम्हाला कोणी प्रश्न कसं काय विचारू शकतं? आम्हाला चौकशीला कसं काय बोलवलं जाऊ शकतं? पण मी असा समज असणाऱ्या प्रत्येकाला सांगू इच्छितो की या देशात कोणीही राजा नाही किंवा राजकुमार नाही. या देशातील प्रत्येक नागरिक हा एकसमान आहे. पंतप्रधान मोदी देखील स्वत:ला जनतेचा सेवक मानतात. त्यामुळे साऱ्यांनी पंतप्रधानांकडून ही गोष्ट शिकली पाहिजे", असे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले.
"काँग्रेस आज गोंधळलेल्या अवस्थेत आहे. कारण AJL ही काँग्रेसची प्रॉपर्टी नव्हती. ते त्यांचे वडिलोपार्जित धन मुळीच नव्हते. पाच हजार स्वातंत्र्यसैनिक या कंपनीचे स्टेकहोल्डर होते. ती त्यांची संपत्ती होती, ते त्यांचे योगदान होते. पण यंग इंडिया नावाची नवीन कंपनी बनवून माय-लेकाने त्यांची संपत्ती हडप केली. त्यामुळे राहुल गांधी आरोपी क्रमांक १ आहेत, तर सोनिया गांधी आरोपी क्रमांक २ आहेत", असे रोखठोक मत पात्रा यांनी व्यक्त केले.
"काँग्रेसचे लोक दिल्लीमध्ये जी नाटक-नौटंकी करत आहेत ते संपूर्ण देश पाहत आहे. भ्रष्टाचारासाठी हा ड्रामा सुरू आहे. पण मला आश्चर्य वाटतं की भ्रष्टाचार तर हे करतातच. पण त्यावर सवाल केले किंवा चौकशीला बोलावलं तर ड्रामादेखील हेच लोक करतात. हे लोक स्वत: न्यायदेवतेपेक्षा मोठे मानतात म्हणून हा सगळा ड्रामा सुरू आहे", असेही संबित पात्रा यांनी नमूद केले.