"राहुल गांधींना मोहेंजोदडोलाच पाठवा, ते तिथलेच पंतप्रधान होऊ शकतात"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 01:04 PM2021-10-14T13:04:32+5:302021-10-14T13:08:23+5:30
BJP Sambit Patra taunt Congress Rahul Gandhi : भाजपा नेता संबित पात्रा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खिल्ली उडवली आहे.
नवी दिल्ली - एका लाईव्ह डिबेट शोमध्ये भाजपा नेता संबित पात्रा (BJP Sambit Patra) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांची खिल्ली उडवली आहे. चर्चेदरम्यान जेव्हा अँकरने काँग्रेस नेते गजेंद्र सिंह सांखला यांना एक प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी टोला लगावला आहे. नविका कुमार यांनी "सवाल पब्लिक का" कार्यक्रमात गजेंद्र सांखला यांना तस्लीम रहमानी यांचं म्हणणं आहे तशीच काँग्रेसची विचारसरणी आहे का? असा प्रश्न विचारला होता. "तुम्हीही त्या विचारसरणीशी सहमत आहात का जी म्हणते या देशाची निर्मिती मुघलांनी केली आहे, बाबरने केली आहे? काँग्रेस पक्ष याच्याशी सहमत आहे का?" असं विचारलं.
गजेंद्र सांखला यांनी यावर उत्तर देताना "मोहेंजोदडोच्या काळात दगडातून आग निर्माण केली जात होती आम्ही असं मानतो. त्यावेळी तितका विकास झाला नव्हता असं तुम्हीच मानता. गेल्या सात-साडे सात वर्षांपासून भाजपाचे हे प्रवक्ते वारंवार काँग्रेसने काहीच काम केलेलं नाही सांगत असतात" असं म्हटलं. यावरून भाजपाचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी टोला लगावण्यास सुरुवात केली. "काँग्रेस मोहेंजोदडोमध्ये काय करत होती? मला हे समजत नाही आहे. राहुल गांधी मोहेंजोदडोमधून आले आहेत का? काय बोलत असता तुम्ही सांखला साहेब…तुमचं म्हणणं पूर्ण कधी होणार, चर्चा आता संपायला आली आहे" असं म्हटलं.
"राहुल गांधींना मोहेंजोदडोलाच पाठवा"
"मोहेंजोदडो, राहुल गांधी, काँग्रेसवादी…कमाल आहे. राहुल गांधींना मोहेंजोदडोलाच पाठवा, ते तिथलेच पंतप्रधान होऊ शकतात" असं देखील संबित पात्रा यांनी म्हटलं आहे. यानंतर नविका कुमार यांनी सांखलाजी समस्या ही आहे की, काँग्रेस पक्षाकडे दुसऱ्याला श्रेय देण्यासाठी वेळच नाही. श्रेयाची चिंता सतावत आहे. वीर सावरकरांशी काही देणं घेणं नाही, ना बाबरशी, ना मुघलांशी…हे तर असं म्हणत आहेत की श्रेय द्यायचं असेल तर फक्त गांधी कुटुंबाला द्या. किमान सांखलांच्या बोलण्यावरुन तरी तसंच वाटत आहे" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"भाजपाने एक जरी जागा जिंकली तर राजकारण सोडेन"; काँग्रेस नेत्याचं जाहीर आव्हान
काँग्रेसचे नेत्याने थेट भाजपाला (BJP) जाहीर आव्हान दिलं आहे. राजस्थानचे क्रीडा मंत्री अशोक चांदना (Congress Ashok Chandna) यांनी "राज्यात पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला एकही जागा मिळाल्यास राजकारण सोडेन" असं मोठं विधान केलं आहे. "राज्यातील आतापर्यंतच्या इतिहासात भाजपाला पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसइतक्या जागा कधीच जिंकता आलेल्या नाहीत आणि ते जिंकूही शकणार नाहीत" असंही चांदना म्हणाले आहेत. राजस्थानमध्ये वल्लभनगर आणि धारियावाड मतदारसंघात 30 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणुका होणार आहेत.