मध्य प्रदेशात भाजपा 28 जागा जिंकला, पण फायदा काँग्रेसला झाला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 04:58 PM2019-05-28T16:58:34+5:302019-05-28T17:00:44+5:30
पाच महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करणाऱ्या भाजपाने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशमध्ये दणदणीत विजय मिळवला. मात्र...
भोपाळ - पाच महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करणाऱ्या भाजपाने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशमध्ये दणदणीत विजय मिळवला. राज्यातीली 29 पैकी 28 जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपाने मिळवलेला विजय राज्यातील अस्थिर सत्ता स्थिर करण्याच्या दृष्टीने काँग्रेसच्या पथ्यावर पडला आहे. त्याचे कारण म्हणजे मध्य प्रदेश विधानसभेतील भाजपाचा एक आमदार लोकसभेच्या निवडणुकीत निवडणून आला आहे. त्यामुळे मध्य प्रदेश विधानसभेत भाजपाचे संख्याबळ एकने घटण्याची शक्यता निर्माण झाली असून, विधानसभेची सदस्यसंख्याही एकने घटून 115 सदस्य असलेल्या काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे पुढच्या सहा महिन्यांसाठी काँग्रेसची सत्ता स्थिर झाली आहे.
रतलाम येथील भाजपा खासदार जी. एस. दामोह यांना पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट दिले होते. आता दामोह हे लोकसभेवर निवडून आल्याने त्यांना विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे मध्य प्रदेश विधानसभेतील भाजपाचे संख्याबळ एकने घटून 108 वर घसरणार आहे. नव्या सदस्याची नियुक्ती होईपर्यंत विधानसभेतील सदस्यसंख्या 229 एवढीच राहणार आहे. त्यामुळे 115 सदस्य असलेल्या काँग्रेसला काही काळासाठी का होईना आपोआप स्पष्ट बहुमत मिळाले आहे.
भाजपा नेते सीताराम शर्मा आणि माजी मुख्य सचिव भगवानदास सांगतात की विधानसभेत सध्या 229 एवढी सदस्यसंख्या असल्याने काँग्रेसकडे पूर्ण बहुमत झाले आहे. तर आम्हाला सरकार पाडण्याची कोणतीही घाई नाही आहे, असे राज्यातील कमलनाश सरकारची घटिका भरत आली आहे, असा वारंवार दावा करणारे विधानसभेतील विरोधी पक्षनेते गोपाल भार्गव यांनी सांगितले.
दामोह यांच्या राजीनाम्यामुळे विधानसभेतील घटणाऱ्या संख्याबळाबाबत विचारले असता भाजपा नेते सीताराम शर्मा यांनी आम्ही याबाबत विचारच केला नव्हता, असे उत्तर दिले. तसेच राज्यातील कमलनाश सरकार पाडण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न सुरू नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.