मध्य प्रदेशात 10 दिवसांत 4 भाजपा नेत्यांच्या हत्या; कार्यकर्ते रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 02:31 PM2019-01-21T14:31:31+5:302019-01-21T14:35:05+5:30

हल्लेखोर अद्याप न सापडल्यानं भाजपा कार्यकर्ते संतप्त

bjp workers protesting against murder of bjp leaders | मध्य प्रदेशात 10 दिवसांत 4 भाजपा नेत्यांच्या हत्या; कार्यकर्ते रस्त्यावर

मध्य प्रदेशात 10 दिवसांत 4 भाजपा नेत्यांच्या हत्या; कार्यकर्ते रस्त्यावर

भोपाळ: मध्य प्रदेशात गेल्या 10 दिवसात 4 भाजपा नेत्यांच्या हत्या झाल्या आहेत. त्यामुळे आज मध्य प्रदेशात आज भाजपा कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात आंदोलन केलं आहे. रविवारी बडवानीत भाजपाचे मंडलचे अध्यक्ष मनोज ठाकरे यांची निर्घृण हत्या झाली. ही हत्या राजकीय हेतूनं करण्यात आल्याचा आरोप भाजपानं केला. याचे पडसाद दिल्लीतही उमटले. 

रविवारी बडवानीमध्ये भाजपाचे मंडल अध्यक्ष मनोज ठाकरेंची हत्या झाली. ते सकाळी फिरण्यासाठी निघाले होते. त्यावेळी दगडांनी ठेचून त्यांची हत्या झाली. त्यांच्या मृतदेहाजवळ रक्तानं माखलेला दगड आढळून आला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र अद्याप गुन्हेगार हाती लागलेले नाहीत. रविवारी संध्याकाळी गुनामध्ये परमाल कुशवाह नावाच्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या झाली. परमाल भाजपाचे संयोजक शिवराम कुशवाह यांचा नातेवाईक होता. यामागे काँग्रेसचा हात असल्याची टीका भाजपानं केली आहे. 

गुरुवारी संध्याकाळी प्रल्हाद बंधवार यांची भरबाजारात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बंधवार यांनी दोनवेळा मंदसौर नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून काम केलं आहे. बंधवार संध्याकाळी सातच्या सुमारास जिल्हा सहकारी बँकेच्या समोर भाजपा नेते लोकेंद्र कुमावत यांच्या दुकानात बसले होते. ते तिथून बाहेर पडताच बुलेटवरील एकानं त्यांना गोळी घातली. बुलेटवरील हल्लेखोर शार्ट शूटर असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

बुधवारी संध्याकाळी इंदूरमधील व्यावसायिक आणि भाजपा नेते संदीप अग्रवाल यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अद्याप या हल्लेखोरांना अटक झालेली नाही. विशेष म्हणजे शहरातल्या सर्वाधिक वर्दळ असलेल्या चौकात ही हत्या झाली. ज्या ठिकाणी हत्या करण्यात आली, त्या भागापासून पोलीस स्टेशन अवघं 100 मीटर दूर आहे. यानंतर अग्रवाल यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांचा मृत्यू झाला. 
 

Web Title: bjp workers protesting against murder of bjp leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.