तुम्ही मत द्या; आम्ही मोफत लस देऊ! बिहारसाठी भाजपचे आश्वासन, विरोधकांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 02:04 AM2020-10-23T02:04:34+5:302020-10-23T06:56:08+5:30
कोरोनावरील लशीचे उत्पादन सुरू झाल्यावर बिहारमधील जनतेला ती लस मोफत उपलब्ध केली जाईल. भाजपच्या जाहीरनाम्यातील हे पहिले वचन आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जाहीरनाम्यात जनतेला कोरोनावरील लस मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे. या आश्वासनावरून विरोधकांनी भाजपला घेरले आहे. भाजप कोरोनावरील लशीचा राजकीय फायदा उठवू पाहत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. या घोषणेनंतर सोशल मीडियावरही टीकेच्या सूरातील पोस्टचा पूर आला होता.
कोरोनावरील लशीचे उत्पादन सुरू झाल्यावर बिहारमधील जनतेला ती लस मोफत उपलब्ध केली जाईल. भाजपच्या जाहीरनाम्यातील हे पहिले वचन आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. सीतारामन यांनी ही घोषणा केल्यानंतर लगेचच एनडीएचा घटक पक्ष असलेल्या अण्णा द्रमुकचे तमिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनीही तमिळनाडूच्या जनतेला कोरोनावरील लस मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे.
राहुल गांधी यांची टि्वटद्वारे टीका -
केंद्र सरकारने नुकतीच कोविड लसीबाबत धोरण आखले आहे. तुमच्या राज्यात विधानसभा निवडणुका कधी आहेत, त्यानुसार तुम्हाला कोरोनावरील लस कधी मिळेल, हे तुम्हाला समजेल, अशी उपरोधिक टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे केली आहे. आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही केंद्राला लक्ष्य केले.
बिगरभाजपशासित राज्यांचे काय? ज्या भारतीयांनी भाजपला मतदान केले नाही, त्यांनी कोरोनावरील मोफत लस मिळणार नाही का? असा सवाल केजरीवाल यांनी विचारला.
तुम मुझे व्होट दो मै तुम्हे व्हॅक्सिन दुंगा, अशा शब्दांत काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. भाजप आपल्या तिजोरीतून लशीचे पैसे देणार आहे का? जर सरकारच्या तिजोरीतून लशीचे पैसे दिले जाणार असतील तर फक्त बिहारलाच मोफत लस का?असा सवाल त्यांनी केला.
भाजपचे प्रत्युत्तर -
भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी विरोधकांना उत्तर देत म्हटले की, ही लस विकायची की मोफत द्यायची हे त्या त्या राज्यने ठरवायचे आहे. आरोग्य हा राज्याचा मुद्दा असल्याने बिहार भाजपने लस मोफत देण्याचे वचन दिले आहे.
७ अब्ज डॉलर्स लागणार -
देशातील १३० कोटी जनतेला कोविड लस देण्यासाठी केंद्र सरकारने तब्बल ७ अब्ज डॉलर्सची ( अंदाजे ५१ हजार कोटी रुपये) तरतूद केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रतिव्यक्ती साधारणतः ४५० ते ५५० रुपये खर्च मोदी सरकारने गृहित धरला आहे.