भारत जोडाेचा बूस्टर डोस! विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत कसोटी लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 06:21 AM2023-02-06T06:21:31+5:302023-02-06T06:22:42+5:30
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी वेळोवेळी ही निवडणूक यात्रा नसून विचारधारेची यात्रा असल्याचे म्हटले होते.
नवी दिल्ली/जयपूर/भोपाळ : काँग्रेसने भारत जोडो यात्रेचे वर्णन ‘बूस्टर डोस’ असे केले आहे; परंतु, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक या विधानसभा निवडणुका होणाऱ्या राज्यांत ही यात्रा पक्षाला नवजीवन देण्यात यशस्वी हाेईल का, याची चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी वेळोवेळी ही निवडणूक यात्रा नसून विचारधारेची यात्रा असल्याचे म्हटले होते. असे असले तरी राजकीय पंडितांचे म्हणणे आहे की, तिची खरी कसोटी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान लागेल. या वर्षी नऊ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यातील कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या चार राज्यांमधून ही यात्रा गेली.
राजस्थानचा प्रश्न कायम
- कर्नाटक आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यांमध्ये काँग्रेसला या यात्रेने थोडाफार फायदा झाल्याचे दिसते; परंतु, राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्या छावणीतील गटबाजी भारत जोडो यात्रेपुरती थंडावली होती, त्यानंतर ती सुरूच असल्याचे चित्र आहे.
- पायलट गटाकडून त्यांना मुख्यमंत्री बनविण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. काँग्रेसला राज्यात पुन्हा सत्तेत यायचे असेल तर गेहलोत- पायलट प्रश्न सोडवावा लागेल, अन्यथा यात्रेचा फायदा शून्य ठरेल, असे पक्ष कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
संघटनात्मक ऐक्य महत्त्वाचे
कन्याकुमारी ते काश्मीर या चार हजार किमीपेक्षा जास्त अंतराच्या या यात्रेने या राज्यांतील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नक्कीच उत्साह आणला आहे; पण त्याचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम होईल की नाही हे संबंधित राज्य काँग्रेस पाठपुरावा ठेवू शकते का, यावर अवलंबून असेल. तसेच, पारंपरिकपणे गटबाजीने ग्रासलेल्या राजस्थान, कर्नाटक आणि तेलंगणा यांसारख्या राज्यांमध्ये संघटनात्मक ऐक्य हे एक महत्त्वाचे आव्हान आहे.
भाजप देणार ‘शेतकरी यात्रे’ने उत्तर
- आगामी विधानसभा आणि २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. ‘भारत जोडो’ यात्रा पूर्ण केलेल्या काँग्रेसकडून सध्या ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान सुरू असताना, आता भाजपने २४ फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय घोषणांच्या व्यापक प्रचारासाठी एक लाख गावांमध्ये पदयात्रा काढून, एक कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
- भाजप किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार चहर म्हणाले, अर्थसंकल्पातील घोषणा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ६ ते १२ फेब्रुवारीदरम्यान देशभरात ‘शेतकरी चावडी’चे आयोजन करण्यात येणार आहे.