मध्य प्रदेशातील सरकार पाडण्यासाठी हालचाली, भाजपाने दिली बसपा आमदाराला कोट्यावधीची ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 07:25 PM2019-05-27T19:25:53+5:302019-05-27T19:30:37+5:30
मध्य प्रदेशमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण करण्यासाठी कमलनाथ यांनी 10 आमदारांना भाजपानं पैशाचं आमिष दाखवण्याचा आरोप केला आहे.
भोपाळ - मध्य प्रदेशमधील बहुजन समाज पार्टीच्या आमदार रमाबाई यांनी भाजपाकडून आमदार विकत घेण्यासाठी कोट्यावधींचे ऑफर दिल्या जात आहेत असा आरोप केला आहे. जे मुर्ख आहेत ते लोक भाजपाच्या आमिषाला बळी पडत आहेत. मला विकत घेण्यासाठीही कॉल आला होता. मंत्रीपद आणि पैसे देण्याची ऑफर मला दिली. पण मी ऑफर नाकारली. एका आमदाराला विकत घेण्यासाठी 50 ते 60 कोटी ऑफर भाजपाकडून देण्यात येत आहे असा आरोप त्यांनी केला.
मध्य प्रदेशमधीलकाँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून हालचाली सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी रविवारी आमदारांशी चर्चा केली. स्थिर सरकार मुद्द्यावर बैठकीत चर्चा झाली. यावेळी कमलनाथ यांनी आमदारांना विचारले की, तुम्ही मला मुख्यमंत्री बनवले आहे. तुम्हीच सांगा मी खुर्ची सोडू का? असा प्रश्न त्यांनी आमदारांना विचारला. त्यावेळी आमदारांनी एकमताने कमलनाथ यांच्यावर विश्वास ठेवत काँग्रेस सरकार पुढील 5 वर्ष कार्यकाळ पूर्ण करेल असं सांगितले.
Ramabai, BSP MLA: They (BJP) are making offers to everyone, only fools will come under their influence. I get phone calls offering both Minister berth & money but I have denied the offers. They are offering Rs 50-60 crore to a number of people. #MadhyaPradeshpic.twitter.com/rP2ZgCKp2I
— ANI (@ANI) May 27, 2019
मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवराज सिंह चौहान यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरु आहे असा इशारा दिला होता. तसेच आमदार विकत घेण्याची संस्कृती भाजपाची नाही. फोडाफोडीचं राजकारण करुन सरकार पाडणं यावर भाजपाचा विश्वास नाही. राज्याच्या विकासासाठी काँग्रेसने सरकार चालवावं सांगत सरकार पाडण्याच्या राजकारणावर उत्तर दिलं आहे.
पण काँग्रेसमधील अंतर्गत विरोध आणि त्यांना पाठिंबा दिलेल्यांनी काही केलं आणि सरकार पडलं तर त्यात भाजपा काय करु शकणार नाही. लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल आल्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी दावा केला होता की, काँग्रेसचे अनेक आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत असा दावा केला होता.
तर मध्य प्रदेशमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण करण्यासाठी कमलनाथ यांनी 10 आमदारांना भाजपानं पैशाचं आमिष दाखवण्याचा आरोप केला आहे. परंतु आम्हाला आमच्या आमदारांवर पूर्ण विश्वास असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. मात्र भाजपा नेते गोपाल भार्गव यांनी राज्यपालांना चिठ्ठी लिहून विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली होती. गोपाल भार्गव म्हणाले होते की, ज्या प्रकारे केंद्र आणि राज्यात भाजपाला जबरदस्त जनाधार मिळालेला आहे. तसेच काँग्रेसचे अनेक आमदार कमलनाथ सरकारला वैतागलेले आहेत. त्यांना भाजपामध्ये प्रवेश हवा आहे. भाजपा काँग्रेसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करणार नाही. परंतु काँग्रेसच्या त्या आमदारांना कमलनाथ सरकारबरोबर काम करायचं नाही. त्यामुळे राज्यपालांनी विशेष अधिवेशन बोलवावं, कारण जनता आता पूर्णतः नाकारत आहे. हे सरकार आपल्या कर्मानं जाणार असल्याचंही भार्गव म्हणाले होते.