मध्यप्रदेशात होणार मंत्रिमंडळ विस्तार; राजकीय नाट्यादरम्यान सरकारचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 03:31 AM2020-03-09T03:31:03+5:302020-03-09T03:31:37+5:30
कमलनाथ यांचे सरकार उलथवून टाकण्यासाठी भाजपने १४ आमदार पळविले, असा आरोप काँग्रेसने अलीकडेच केला होता.
भोपाळ : मध्यप्रदेशातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार भाजपने अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपानंतर राज्यात चाललेल्या राजकीय नाट्यादरम्यान मध्यप्रदेश मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार केला जाणार आहे.
कमलनाथ यांचे सरकार उलथवून टाकण्यासाठी भाजपने १४ आमदार पळविले, असा आरोप काँग्रेसने अलीकडेच केला होता.
मध्यप्रदेश मंत्रिमंडळाचा लवकर विस्तार करणार आहोत, असे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. सत्तारूढ काँग्रेसच्या विविध गटांतील आमदार आणि मित्रपक्ष व अपक्षांचा मंत्रिमंडळात समावेश करणे, हे सरकारसाठी कठीण काम आहे, असे एका राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले होते. २३० सदस्यीय विधानसभेत काँग्रेसचे ११४ आमदार असून बसपाचे दोन, समाजवादी पार्टीच्या एका आणि चार अपक्ष आमदारांचा काँग्रेसला पाठिंबा आहे. भाजपचे १०७ आमदार असून दोन जागा रिक्त आहेत. मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासह राज्य मंत्रिमंडळात २९ सदस्य आहेत.
३ आमदार नॉट रिचेबल
१० आमदार मंगळवारी बेपत्ता झाले होते. त्यात दोन बसपा, एक सपा आणि एक अपक्ष आणि उर्वरित काँग्रेसचे आमदार होते. त्यानंतर काँग्रेसला सात आमदारांना परत आणण्यास यश आले. तथापि, काँग्रेसचे तीन आमदार हरदीप सिंह डांग, बिसाहूलाल सिंह आणि रघुराज कन्साना यांचा अद्याप ठावठिकाणा नाही.