मध्य प्रदेशात मतदानापूर्वी भाजपा नेत्याच्या कारमध्ये सापडली कॅश, काँग्रेसकडून रास्तारोको
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 09:45 PM2018-11-27T21:45:08+5:302018-11-27T21:52:02+5:30
सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत असल्याने यावेळी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी चुरशीच्या वातावरणात प्रचार झाला.
इंदूर - सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत असल्याने यावेळी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी चुरशीच्या वातावरणात प्रचार झाला. प्रचार समाप्त झाल्यानंतर नेतेमंडळींनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी वैध-अवैध मार्ग अवलंबण्यास सुरुवात केली असून, मतदानाला एक दिवस शिल्लक असताना राज्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते देवराज सिंह परिहार यांच्या वाहनामध्ये रोख रक्कम सापडली आहे. पोलिसांनी ही रक्कम जप्त केली आहे. मात्र पोलिसांनी सत्ताधारी भाजपाच्या दबावामुळे देवराज सिंह यांना घटनास्थळावरून जाऊ दिले. असा आरोप करत काँग्रेसने रास्ता रोको केले.
भाजपाचे ज्येष्ठ नेते असलेले देवराज सिंह परिहार हे राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे उपाध्यक्ष आहे. त्यांना मध्य प्रदेश सरकारने राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला आहे. पोलीस अधिकारी मानसिंह परमार यांनी सांगितले की, सांवेर विधानसभा मतदारसंगातील हतुनिया फाटा येथे परिहार यांच्या वाहनाची तपासणी केली असता त्यात 2 लाख 6 0 हजार रुपये आढळले.
पोलीस घटनास्थळी चौकशी करत असतानाच काँग्रेस कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. तसेच त्यांनी परिहार यांच्या वाहनाला घेराव घालून आंदोलन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या लागल्या. तिथे निर्माण झालेल्या गोंधळाच्या वातावरणाचा फायदा घेऊन परिहार आणि त्यांचा ड्रायव्हर घटनास्थळावरून पसार झाले. असा दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान, परिहार हे मतदारांना पैसे देऊन आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते निलाब शुक्ता यांनी केला आहे.