केंद्राने देशाला द्वेषाच्या आगीत ढकलले, राहुल गांधींची घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 10:31 AM2022-08-30T10:31:02+5:302022-08-30T10:31:35+5:30
Rahul Gandhi: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी महागाईवरून केंद्र सरकारवर पुन्हा घणाघात केला. २०२२ पर्यंत आपण विश्वगुरू बनू, असे सांगण्यात आले होते. मात्र, देशाला द्वेषाच्या आगीत ढकलण्यात आले, असा आरोप त्यांनी केला.
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी महागाईवरून केंद्र सरकारवर पुन्हा घणाघात केला. २०२२ पर्यंत आपण विश्वगुरू बनू, असे सांगण्यात आले होते. मात्र, देशाला द्वेषाच्या आगीत ढकलण्यात आले, असा आरोप त्यांनी केला.
बेरोजगारी, महागाई आणि कराच्या ओझ्याखाली जनता दबत चालली असून, काँग्रेस याविरुद्ध भारत जोडो यात्रा सुरू करणार आहे. यात माझ्यासोबत देशातील प्रत्येक नागरिक आहे, असे ते म्हणाले.
काँग्रेसकडून ‘दिल्ली चलो’ची हाक
महागाईच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. काँग्रेसच्या नेत्यांनी देशातील २२ शहरांत पत्रकार परिषदा घेऊन ४ सप्टेंबर रोजी दिल्लीत महागाईवर हल्लाबोल करण्यासाठी ‘दिल्ली चलो’ची हाक दिली. या रॅलीला राहुल यांच्यासह ज्येष्ठ नेते संबोधित करणार आहेत.
जनतेच्या प्रश्नावर मागे हटणार नाही
मुद्दे अनेक आहेत, ज्यांच्यावर चर्चा झाली पाहिजे, प्रश्न विचारले गेले पाहिजेत आणि उत्तरे मिळाली पाहिजेत. जनतेचे मुद्दे उपस्थित केल्याने सरकार जर सुडाचे राजकारण करणार असेल तर आम्ही सर्व काही सोसण्यास तयार आहोत. सत्य बोलल्याबद्दल माझ्यावर तुम्हाला जेवढे हल्ले करायचे तेवढे करा, मी मागे हटणार नाही, असे ते म्हणाले.