द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 06:24 AM2024-05-10T06:24:45+5:302024-05-10T06:25:08+5:30
राहुल गांधी यांना विश्वास; 'भाजप'च्या हातातून निवडणूक निसटल्याचा केला दावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: पंतप्रधानांच्या हातातून लोकसभा निवडणूक हळूहळू निसटत चालली असून, आता देशातील तरुणांचे - लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी ते नवीन काहीतरी नाटक करण्याचा प्रयत्न करतील. मात्र, तरुणांनी विचलित होऊ नये. ४ जूनरोजी इंडिया आघाडीचे सरकार सत्ता स्थापन करणार असून, आम्ही १५ ऑगस्टपर्यंत आम्ही ३० लाख नोकऱ्या देण्याचे काम सुरू करणार असल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला.
हिंदूची लोकसंख्या घटल्याचा दावा करणारा एक अहवाल येताच त्यांनी एक व्हिडीओ प्रसारित केला. तरुण हे देशाची ताकद आहे. चार-पाच दिवसांत काहीतरी नाटक करून तुमचे लक्ष विचलित करण्याचा - प्रयत्न होईल. मात्र, तुम्ही तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे.
आम्ही नोकरीची गॅरंटी देणार
देशातील तरुणानो, ४ जून रोजी 'इंडया'चे सरकार स्थापन होत आहे. आम्ही गॅरंटी देतो की, १५ ऑगस्टपर्यंत आम्ही ३० लाख रिक्त सरकारी पदांवर भरतीचे काम सुरू करू, भाजपच्या खोट्या प्रचाराने विचलित होऊ नका, आपल्या मुद्द्यांवर ठाम राहा. 'इंडिया'चे ऐका. द्वेष नव्हे तर नोकरी निवडा.
- राहुल गांधी, काँग्रेस नेते
देशात सध्या बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या असून, दोन कोटी तरुणांना रोजगार देऊ, असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले होते. मात्र, ते खोटे बोलले आणि त्यांनी नोटबंदी केली. चुकीचा जीएसटी लागू केला आणि उद्योगपतींसाठी काम केले. आम्ही नोकरीची गॅरंटी योजना आणत आहोत. सरकार येतात ३० लाख तरुणांना नोकऱ्या देण्याचे काम सुरू करू, असे त्यांनी म्हटले आहे.
कुटुंब नियोजनाचा कायदा तत्काळ लागू करा
देशात तत्काळ कुटुंब नियोजनाचा कायदा लागू केला पाहिजे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने दिलेल्या अहवालातील निष्कर्षांवर सर्वांनीच गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.
-साक्षी महाराज, खासदार, भाजपभाजप देशावरील महत्त्वाच्या प्रश्नांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवू पाहात आहे. लोकांच्या आयुष्याशी निगडित असलेल्या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांची सुरक्षा अशा विषयांवर भाजप बोलायला तयार नाही. या मुद्द्यांवर चर्चा होऊ नये, असा त्यांचा प्रयत्न असतो.
- प्रियांका गांधी, सरचिटणीस, काँग्रेस१९५० ते २०१५ या कालावधीत भारतात हिंदूंची संख्या ७.८२ टक्क्यांनी घटली आहे, असा निष्कर्ष पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या एका अहवालात काढण्यात आला आहे. ही आकडेवारी पाहिली तर विरोधी पक्ष भारताला इस्लामी देश बनविण्याच्या तयारीला लागल्याचे दिसून येते. काँग्रेसने भारताला धर्मशाळा बनविले. बांगलादेशी घुसखोर, रोहिंग्या यांची मतपेढी वाढविण्याचा या पक्षाचा प्रयत्न आहे. आता मुसलमानांना आरक्षण देण्याच्या गोष्टी केल्या जात आहेत.
- गिरीराज सिंह, केंद्रीय मंत्रीमुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येबाबतचा अहवाल हा व्हॉट्सअॅप विद्यापीठाचा आहे. अहवाल अभ्यासूनच प्रतिक्रिया देईन.
-असदुद्दीन ओवैसी, 'एआयएमआयएम'चे प्रमुखआर्थिक सल्लागार परिषदेने तयार केलेल्या अहवालाद्वारे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा व विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपचा हा अजेंडा आहे. गेली १० वर्षे या पक्षाच्या केंद्र सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. २०११च्या नंतर जनगणना करण्यात आली नाही. ती २०२१ साली होणे आवश्यक होते. मात्र, २०२४ साल उजाडले तरी जनगणना झालेली नाही.
-तेजस्वी यादव, 'राजद नेते