नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिल्याने राहुल गांधी शिवसेनेवर नाराज, नाव न घेता दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 04:06 PM2019-12-10T16:06:38+5:302019-12-10T16:08:18+5:30
महाराष्ट्रात काँग्रेससोबत आघाडी केल्यानंतरही शिवसेनेने नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा देण्याच्या घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी नाराज झाले आहेत.
नवी दिल्ली - सोमवारी रात्री नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत पारित झाले. या विधेयकाला भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमधून बाहेर पडलेल्या शिवसेनेनेसुद्गा पाठिंबा दिला होता. दरम्यान, महाराष्ट्रात काँग्रेससोबत आघाडी केल्यानंतरही शिवसेनेने नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा देण्याच्या घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी नाराज झाले आहेत. त्यांनी ट्विटरवरून नाव न घेता शिवसेनेला टोला लगावला आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकाला जे कुणी पाठिंबा देत आहेत ते देशाच्या मुळावर घाव घालत आहेत, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
नागरिकत्व सुधारणा विधेयकाला तीव्र विरोध दर्शवताना राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात की,''नागरिकत्व सुधारणा विधेयक हे भारताच्या संविधानावरील हल्ला आहे. जे कुणी या विधेयकाला पाठिंबा देत आहेत ते या देशाच्या मुळावर घाव घालून त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत.'' या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी शिवसेनेचा नामोल्लेख टाळला असला तरी शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेबाबत राहुल गांधी यांनी या ट्विटमधून नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.
The #CAB is an attack on the Indian constitution. Anyone who supports it is attacking and attempting to destroy the foundation of our nation.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 10, 2019
पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या बिगर मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व बहाल करणारे नागरिकत्व सुधारणा विधेयक गृहमंत्री अमित शाह लोकसभेत मांडले होते. यानंतर आज (सोमवारी) रात्री नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयकावर लोकसभेत मतदान घेण्यात आले. या विधेयकाच्या बाजूने 311 खासदार मतदान केलं. तर या विधेयकाच्या विरोधात 80 खासदारांनी मतदान केले.
दरम्यान, लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक सहजपणे पारित करून घेणाऱ्या मोदी सरकारसमोर राज्यसभेमध्ये हे विधेयक पारित करून घेण्याचे आव्हान आहे. मात्र राज्यसभेत भाजपाकडे स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळे हे विधेयक पारित करून घेण्यासाठी भाजपाला इतर पक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे. दरम्यान, शिवसेनेने राज्यसभेत विधेयकाच्या विरोधात भूमिका घेतल्यास राज्यसभेत भाजपाचा आकड्यांचा खेळ बिघडू शकतो. सध्या राज्यसभेमध्ये केंद्र सरकारला भाजपा आणि मित्रपक्षांचा मिळून 119 खासदारांचा पाठिंबा आहे. तर विरोधामध्ये 100 सदस्य आहेत. यामध्ये शिवसेनेचाही समावेश केला तर ही संख्या 103 होते. तर 19 खासदारांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही.