Ashok Gehlot: “राहुल गांधी एक जननायक आहेत, पंतप्रधान मोदींसमोर केवळ तेच असल्याचे देशाने मान्य केलेय”
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 06:06 PM2023-02-12T18:06:31+5:302023-02-12T18:07:23+5:30
Ashok Gehlot: संपूर्ण विरोधक एकवटले आहेत. राहुल गांधींच्या रुपात एक अद्भुत नेता काँग्रेसकडे आहे, अशी स्तुती करण्यात आली आहे.
Ashok Gehlot:काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची अलीकडेच सांगता झाली. यानंतर राहुल गांधी यांनी संसदेत अदानी समूहासंदर्भात हिंडेनबर्ग संस्थेने दिलेल्या अहवालावरून केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर सडकून टीका केली. यानंतर अनेक काँग्रेस नेत्यांनी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी राहुल गांधी यांचे कौतुक केले. यातच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राहुल गांधी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. राहुल गांधी एक जननायक आहेत. पंतप्रधान मोदींसमोर केवळ तेच सक्षम असल्याचे देशाने मान्य केले आहे, असा दावा अशोक गहलोत यांनी केला आहे.
मोदींसमोर केवळ राहुल गांधीच आहेत. आमच्या नेत्यांबद्दल माझ्या मनात आदर आहे. मात्र वस्तुस्थिती ही आहे की, काँग्रेसच एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे आणि राहुल गांधींच्या रुपात एक अद्भुत नेता काँग्रेसकडे आहे. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी हे एक जननायक म्हणून सर्वांसमोर आले आहेत, असे अशोक गहलोत म्हणाले. काँग्रेस एक अखिल भारतीय आणि खरी राष्ट्रीय पार्टी आहे. ती प्रत्येक गावात आहे, असेही गहलोत यांनी सांगितले.
जेव्हा जनता ठरवते, तेव्हा काहीही होऊ शकते
भाजप आता सत्तेत आहे, मात्र एक काळ होता जेव्हा त्यांच्याकडे संसदेत केवळ दोन जागा होत्या. म्हणून जागांच्या संख्येवर नाही गेले पाहिजे, जेव्हा जनता ठरवते तेव्हा काहीही होऊ शकते. मुद्दे सर्वच पक्षांसाठी समान आहेत. अदानी तर सोडा. अहिंसा, महागाई, बेरोजगारीचे मुद्दे आहेत. पंतप्रधान बोलण्यात चतुर आहेत, तर चतुराई कधीपर्यंत चालणार? अशी विचारणा अशोक गहलोत यांनी केली. तसेच संपूर्ण विरोधक एकवटले आहेत. तुम्ही जनतेचा मूड कधीच ओळखू शकत नाहीत. इंदिरा गांधींच्या काळात पाहिला आहे. अटल बिहारी वाजपेयींच्या काळातही इंडिया शायनिंग अॅण्ड फील गुडची चर्चा व्हायची. कुणालाही वाटत नव्हते की, वाजपेयी सरकार पराभूत होऊ शकते. मात्र ते पराभूत झाले. देश याचा साक्षीदार आहे, असे गहलोत यांनी नमूद केले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करायल हवा. तुम्हाला २०१४ मध्ये ३१ टक्के मते मिळाली होती. २०१९ मध्ये ती वाढली. मात्र तुम्हाला १०० टक्के मते मिळालेली नाहीत. जनतेमधील एका मोठ्या वर्गाने तुमच्या विरोधात मतदान केले आहे. त्यांनी विरोधी पक्षांना मत दिले आहे, त्यामुळे पंतप्रधांनांनी विरोधकांचा आदर केला पाहिजे आणि त्यांचे म्हणणे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी अपेक्षा अशोक गहलोत यांनी व्यक्त केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"