"राहुल गांधींनी आपल्या वडिलांना आणले, तरी...", प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 11:29 AM2024-11-10T11:29:13+5:302024-11-10T11:30:18+5:30
Rajasthan Assembly by Election : मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी टोंक जिल्ह्यातील देवली-उनियारा विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार राजेंद्र गुर्जर यांच्या समर्थनार्थ शनिवारी जाहीर सभेला संबोधित केले.
राजस्थानमध्ये विधानसभेच्या सात जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षाकडून जोरदार प्रचार सुरु आहे. राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येत आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी टोंक जिल्ह्यातील देवली-उनियारा विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार राजेंद्र गुर्जर यांच्या समर्थनार्थ शनिवारी जाहीर सभेला संबोधित केले.
यावेळी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची जीभ घसरली. तसेच, जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू केले जाणार नाही, असे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी स्पष्टपणे सांगितले. जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० लागू करण्याचा प्रस्ताव आणि सभागृहात घडलेल्या हाणामारीच्या घटनेचा संदर्भ देत काँग्रेसवर निशाणा साधला. जम्मू-काश्मीरमध्ये ज्यांनी कलम ३७० हटवले, त्यांच्याविरोधात काँग्रेस उभी आहे, असे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा म्हणाले.
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा म्हणाले की, "काल तुम्ही पाहिले असेल की जम्मू-काश्मीरमधील काँग्रेसचे लोक त्यांच्यासोबत उभे आहेत, जे कलम ३७० पुन्हा लागू करण्यासंदर्भात बोलत आहेत. मला तुम्हाला विचारायचे आहे की, हे पुन्हा लागू केले जाऊ शकेल का? राहुल गांधींजी तुमची गोष्ट विसरा, तुम्ही तुमच्या वडिलांना आणले, तरी काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करता येणार नाही." तसेच, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णय हा मोदी सरकारने घेतलेल्या प्रमुख निर्णयांपैकी एक असल्याचे म्हटले आहे.
याचबरोबर, "आम्ही राम मंदिराची तारीख सांगितली आणि मंदिरही बांधले. काँग्रेस ही देशातील भ्रष्टाचाराची जननी आहे. काँग्रेसवाल्यांना द्वेषयुक्त भाषा आवडते. राजस्थानमध्ये जेव्हा कन्हैया लाल यांचा मृत्यू झाला, तेव्हा हे काँग्रेसवाले तोंडाला टेप लावून बसले", असा आरोप सुद्धा मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी केला. दरम्यान, राजस्थानमधील झुंझुनू, दौसा, देवली-उनियारा, खींवसार, चौरासी, सलुम्बर आणि रामगढ या जागांवर १३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.