भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 07:16 AM2024-04-29T07:16:22+5:302024-04-29T07:17:35+5:30
कटक : एकीकडे केंद्रात अब्जाधीशांसाठी सरकार चालवले जाते, तर दुसरीकडे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक अशा सरकारचे नेतृत्व करतात जे ...
कटक : एकीकडे केंद्रात अब्जाधीशांसाठी सरकार चालवले जाते, तर दुसरीकडे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक अशा सरकारचे नेतृत्व करतात जे केवळ निवडक लोकांसाठी काम करतात, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी केला. बीजू जनता दल (बीजेडी) आणि भाजप एकमेकांविरुद्ध निवडणूक लढत असले तरी प्रत्यक्षात ते एकत्र काम करत आहेत, असा दावाही त्यांनी केला.
सालेपूर येथे एका प्रचारसभेत गांधी म्हणाले की, बीजेडी आणि भाजप दोघेही एकत्र आहेत. पटनायक मुख्यमंत्री असतानाही राज्यातील बीजेडी सरकार त्यांचे सहकारी व्ही. के. पांडियन चालवत आहेत. जमिनी हडप करून त्यांनी २० हजार कोटींची लूट केली. वृक्षारोपण घोटाळा १५,००० कोटी रुपयांचा होता. इथे आणि दिल्लीत सरकार बनताच तुमचे पैसे परत देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सत्तेवर आल्यास बेरोजगारांना शिकाऊ उमेदवारी मिळेल, पहिल्या नोकरीची वर्षासाठी हमी देऊ. ओडिशात सरकार स्थापन केल्यास महिलांना दरमहा २ हजार, बेरोजगारांना ३ हजार रुपये दरमहा, २०० युनिट मोफत वीज, सिलिंडर ५०० रुपयांना देऊ, असे राहुल म्हणाले.
‘हताशेमुळे भीती पसरवण्यात येत आहे’
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यांत हताशेला सामोरे गेल्यानंतर आता सत्ताधारी भय पसरवण्यात गुंतले आहेत, असा आरोप काँग्रेसने रविवारी केला. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी याबाबत पोस्ट केले. ‘दुसरा टप्पा संपल्यानंतर भीती पसरविली जात आहे.
खोटे बोलण्याऐवजी आणि भीती दाखवण्याऐवजी, भाजपच्या खासदारांनी लोकप्रतिनिधी म्हणून इतकी खराब कामगिरी का केली? सात महिन्यांच्या विलंबानंतरही केंद्राने २० टक्क्यांपेक्षा कमी दुष्काळ निवारण निधी का दिला? केंद्राने अप्पर भद्रा आणि महादयी प्रकल्प का रोखून धरले? या पश्नांची उत्तरे द्यावीत, असे रमेश म्हणाले.