राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 07:00 PM2024-09-24T19:00:42+5:302024-09-24T19:01:06+5:30
राहुल गांधी यांच्यावर देशविरोधी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे, तामिळनाडूमधील भाजप नेते डॉ. व्यंकटेश मौर्य यांनी राहुल गांधींविरोधाततामिळनाडूतील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात भारत देश आणि आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात या तक्रार केली आहे.
तक्रार का केली?
एएनआयशी बोलताना भाजप नेते डॉ. व्यंकटेश मौर्य म्हणाले की, "आम्ही राहुल गांधींच्या विरोधात तामिळनाडूतील विविध जिल्ह्यांतील 30 पोलिस ठाण्यांमध्ये तक्रार दिली आहेत. याचे कारण म्हणजे, आम्ही सत्तेत आल्यावर आरक्षण संपवू, असे वक्तव्य त्यांनी परदेशात केले. राहुल गांधी देशाचे विरोधी पक्षनेते आणि खासदार आहेत. महत्वाच्या पदावर असल्याने त्यांनी देशाबाहेर जाऊन अशाप्रकारची वक्तव्ये चुकीची आहेत. ते देशांत काहीही बोलू शकतात, तो त्यांचा अधिकार आहे. पण, परदेशात जाऊन भारत सरकार, एससी-एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणाबाबत खोटा प्रचार त्यांनी केला आहे."
#WATCH | Chennai, Tamil Nadu: Dr Venkatesh Mourya, BJP leader says, " We have given complaint in 30 Police stations in different districts across Tamil Nadu against Rahul Gandhi because when he went abroad, he said there that if BJP comes to power, we will end the SC, ST and OBC… pic.twitter.com/VDGyt1JgHh
— ANI (@ANI) September 24, 2024
देशविरोधी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी
ते पुढे म्हणाले की, "आम्ही राहुल गांधींच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली असून त्यांच्यावर देशविरोधी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. गरज भासल्यास त्यांना अटक करावी, संसद सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशीही आमची मागणी आहे. 30 सप्टेंबरला चेन्नईत आम्ही त्यांच्याविरोधात आंदोलन करणार आहोत. त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली पाहिजे," असेही ते यावेळी म्हणाले.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
अमेरिका दौऱ्यात विविध कार्यक्रमात सहभागी झालेल्या राहुल गांधींनी आरक्षणासोबतच देशातील बेरोजगारी, शीख समुदाय, चीनशी संबंध...अशा अनेक मुद्द्यांवर वादग्रस्त विधाने केली होती. वॉशिंग्टन डीसी येथील जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधताना ते म्हणाले होते की, भारतात कौशल्याची कमतरता नाही, पण कुशल लोकांचा आदर केला जात नाही. देशातील प्रत्येकाला समान संधी मिळू लागल्यावरच काँग्रेस आरक्षण संपवण्याचा विचार करेल, परंतु सध्या भारतात तशी परिस्थिती नाही. याशिवाय, भारतातील शीख समुदायाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते.