प्रियांका गांधी यांनी घेतली गृहमंत्री अमित शाह यांची भेट, काय होतं कारण? काय केली मागणी?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 10:45 PM2024-12-04T22:45:25+5:302024-12-04T22:46:44+5:30
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी केरळमधील लोकसभा सदस्यांसह बुधवारी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली...
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी केरळमधील लोकसभा सदस्यांसह बुधवारी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले. संसद भवन संकुलातील शाह यांच्या कार्यालयात ही बैठक झाली. या बैठकीदरम्यान केरळमधील काँग्रेस, आययूएमएल आणि आरएसपीचे खासदारही उपस्थित होते.
शाह यांची भेट घेतल्यानंतर खासदार प्रियंका गांधी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “आम्ही गृहमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना वायनाडमधील परिस्थितीची माहिती दिली. तेथील लोकांवर भूस्खलनाचा मोठा परिणाम झाला आहे. लोकांची कुटुंबे आणि घरे उद्ध्वस्त झाली आहेत, त्यांच्याकडे कुठलाही आधार उरलेला नाही.
प्रियांका म्हणाल्या, “अशा परिस्थितीत केंद्र सरकारने काहीच केले नाही, तर लोकांनी कुणाकडून अपेक्षा करावी? आम्ही गृहमंत्र्यांना राजकारणापलीकडे जाऊन वायनाडच्या लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा तेथील पीडितांची भेट घेतली होती, तेव्हा लोकांना मनात मदतीची आस जागृत झाली होती. मात्र, आजपर्यंत कुठल्याही प्रकारची मदत मिळालेली नाही."
यासंदर्भात आम्ही पंतप्रधानांना आणि गृहमंत्र्यांना निवेदन दिले असून पीडितांना मदत करण्याची विनंती केली असल्याचेही प्रियांका यांनी यावेळी सांगितले. तत्पूर्वी, वायनाडमध्ये याच वर्षाच्या जुलै महिन्यात भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला होता. यात अनेकांना जीवही गमवावा लागला होता.
यावेळी, आपल्याला लोकांच्या समस्यां माहीत आहेत आणि यासंदर्भात शक्य तेवढी मदत केली जाईल, असे आश्वासन गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्याचे प्रियांका यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितले.