वाद पेटला! राहुल गांधींच्या ट्विटर अकाऊंटनंतर आता काँग्रेसचंही अकाऊंट लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 10:26 AM2021-08-12T10:26:47+5:302021-08-12T10:32:05+5:30
काँग्रेसच्या अनेक नेत्यांची ट्विटर अकाऊंट लॉक
नवी दिल्ली: काँग्रेस आणि ट्विटर यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचं अकाऊंट बंद केल्यानंतर आता ट्विटरनं काँग्रेसचं अकाऊंट बंद केलं आहे. ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. आमचा लढा सुरूच राहील, असा निर्धार काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आला आहे.
ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आल्याची माहिती काँग्रेसनं फेसबुकच्या माध्यमातून दिली. 'आमच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आलं, त्यावेळीही आम्ही घाबरलो नाही. मग ट्विटर अकाऊंट बंद केल्यानं का घाबरू? आम्ही काँग्रेस आहोत. जनतेचा संदेश आहोत. आम्ही लढत आहोत. लढत राहू,' असा निश्चय काँग्रेसनं केला आहे. बलात्कार पीडित मुलीला न्याय देण्याासाठी आवाज उठवणं अपराध असेल, तर हा अपराध आम्ही शंभरवेळा करू. जय हिंद, सत्यमेव जयते, अशी प्रतिक्रिया काँग्रेसनं दिली आहे.
दिल्लीत एका नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. बलात्कारानंतर मुलीची हत्या करण्यात आली. या मुलीच्या कुटुंबीयांची राहुल गांधींनी भेट घेतली. या भेटीचा फोटो राहुल यांनी ट्विटरवरून शेअर केला होता. त्यामुळे ट्विटरनं राहुल यांचं अकाऊंट लॉक करण्यात आलं. राहुल गांधींसोबतच काँग्रेसच्या आणखी काही नेत्यांची अकाऊंट्सदेखील ट्विटरकडून बंद करण्यात आली आहेत. यामध्ये रणदीप सुरजेवाला, अजय माकन, सुष्मिता देव यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे.