काँग्रेसकडून लोकसभेसाठी ३९ शिलेदारांची घोषणा; पहिल्या उमेदवार यादीची ६ ठळक वैशिष्ट्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 09:01 PM2024-03-08T21:01:25+5:302024-03-08T21:08:30+5:30
उमेदवारांची पहिली यादी घोषित करताना वेगवेगळ्या समाजघटकांना प्रतिनिधित्व मिळेल, याची खबरदारी घेण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आल्याचं दिसत आहे.
Lok Sabha Election Congress ( Marathi News ) : नवी दिल्ली इथे झालेल्या काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस देशभरात इंडिया आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याने ज्या मतदारसंघांचं जागावाटप निश्चित झालं आहे, तेथील उमेदवारांच्या नावांची घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे. निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला आव्हान देण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असून उमेदवारांची पहिली यादी घोषित करताना वेगवेगळ्या समाजघटकांना प्रतिनिधित्व मिळेल, याची खबरदारी काँग्रेसकडून घेण्यात आल्याचं दिसत आहे.
काँग्रेसने जाहीर केलेल्या ३९ उमेदवारांमध्ये १५ उमेदवार सर्वसाधारण प्रवर्गातील आहेत, तर २४ उमेदवार एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्यांक आहेत. या ३९ उमेदवारांमध्ये १२ उमेदवारांचं वय ५० वर्षांपेक्षा कमी आहे, तर ८ उमेदवार हे ५० ते ६० वर्षे वयोगटातील आहेत. तसंच १२ उमेदवार ६१ ते ७० आणि ७ उमेदवार ७१ ते ७६ वर्षे वयोगटातील आहेत. याबाबत काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी माहिती दिली आहे.
काँग्रेसच्या पहिल्या यादीत ३९ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली असून काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी हे पुन्हा एकदा केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार असणार आहेत. काँग्रेसच्या पहिल्या यादीत छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र भाजपप्रमाणेच काँग्रेसनेही महाराष्ट्राबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला असून महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही.
कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge की अध्यक्षता में आयोजित 'केंद्रीय चुनाव समिति' की बैठक में लोकसभा चुनाव, 2024 के लिए 39 लोकसभा सीटों पर कांग्रेस उम्मीदवारों के नाम घोषित किए गए। pic.twitter.com/jOQk3rycwG
— Congress (@INCIndia) March 8, 2024
महाराष्ट्रातील उमेदवारांच्या घोषणेला उशीर का?
महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक लढवणार असून अद्याप जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये काही जागांवरून मतभेद असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे जोपर्यंत जागावाटपावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत काँग्रेसकडूनही महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा होणार नसल्याचं स्पष्ट आहे.