काँग्रेसकडून ५ राज्यांसाठी पक्ष निरीक्षक नियुक्त; रणदीप सुरजेवालांकडे मध्य प्रदेश तर मधुसूदन मिस्त्रींकडे राजस्थानची जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 11:06 PM2023-07-31T23:06:04+5:302023-07-31T23:07:05+5:30
पाच राज्यांमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
नवी दिल्ली : काँग्रेसने सोमवारी निवडणुका असलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम राज्यासाठी वरिष्ठ निरीक्षक आणि निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. या नियुक्त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. या पाच राज्यांमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने जारी केलेल्या पत्रानुसार, पक्षाने मधुसूदन मिस्त्री आणि शशिकांत सेंथिल यांची राजस्थानसाठी वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. याचबरोबर मध्य प्रदेशसाठी रणदीप सिंग सुरजेवाला यांना वरिष्ठ निरीक्षक आणि चंद्रकांत हंडोरे यांना निरीक्षक बनवण्यात आले आहे. छत्तीसगडमध्ये प्रीतम सिंग वरिष्ठ निरीक्षक आणि मीनाक्षी नटराजन निरीक्षक म्हणून दिसणार आहेत.
याचबरोबर, तेलंगणामध्ये दीपा दासमुन्शी यांची वरिष्ठ निरीक्षक आणि श्रीवेल्ला प्रसाद यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, ४० विधानसभेच्या जागा असलेल्या मिझोरमसाठी काँग्रेसने सचिन राव यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. हे राज्य लहान आहे, त्यामुळे त्यासाठी केवळ एका निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
निरीक्षकाची भूमिका महत्त्वाची
राजकीय पक्षांमध्ये निरीक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तिकीट वाटपापासून ते निवडणुकीची रणनीती बनवण्यापर्यंत निरीक्षक काम करतात. यावरून निवडणुकीतील निरीक्षकांच्या भूमिकेचा अंदाज लावता येतो. यासोबतच निवडणुकीच्या काळात पक्ष एकसंध ठेवायचा, नेत्यांची नाराजी दूर करायची आणि सर्वांचे म्हणणे ऐकून पक्षाला विजय मिळवून देण्याचाही निरीक्षकांचा प्रयत्न असतो.
कोणत्या राज्यात कोणाचे सरकार?
विधानसभा निवडणुका होणाऱ्या पाच राज्यांबद्दल बोलायचे झाले तर राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. सध्या राजस्थानमध्ये अशोक गेहलोत मुख्यमंत्री आहेत आणि छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल मुख्यमंत्री आहेत. तर मध्य प्रदेशात भाजपचे सरकार आहे आणि मिझोराममध्ये एनडीए आघाडीचे सरकार आहे. मध्य प्रदेशात २३० विधानसभा जागांसह शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री आहेत आणि मिझोराममध्ये कोनराड संगमा मुख्यमंत्री आहेत. दुसरीकडे, तेलंगणात बीआरएस पक्षाची सत्ता आहे आणि के चंद्रशेखर राव मुख्यमंत्री आहेत.