काँग्रेसचा भाजपवर पलटवार; नाइटक्लबमधील राहुल गांधींच्या पार्टीचं सत्य काय, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 02:39 PM2022-05-03T14:39:27+5:302022-05-03T14:44:22+5:30
राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींप्रमाणे, न बोलावताच पाकिस्तानचा दौरा तर नाही केला....
भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ शेअर करत, त्यांच्यावर नाईट क्लबमध्ये पार्टी केल्याचा आरोप केला आहे. यावर उत्तर देत, यात चूक काय? असा प्रश्न काँग्रेसने भाजपला विचारला आहे. यासंदर्भात बोलताना काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले, राहुल गांधी एका मित्राच्या लग्नात सहभागी होण्यासाठी काठमांडू येथे गेले होते. याच बरोबर त्यांनी भाजपला वीज पुरवठ्यासह महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष देण्याचा सल्लाही दिला आहे.
सुरजेवाला म्हणाले, 'राहुल गांधी हे एका मित्राच्या लग्नासाठी काठमांडू येथे गेले होते. ते खासगी दौऱ्यावर होते. पण, भाजपचे लोक ऊर्जा संकट आणि महागाई सारख्या मुद्द्यांवर उत्तर का देत नाहीत. त्यांच्याकडे केवळ राहुल गांधींवर बोलण्यासाठीच संपूर्ण वेळ आहे.'
राहुल गांधी यांच्या जवळच्या नेत्याने भाजपवर निशाणा साधताना म्हटले आहे, 'या देशात कुटुंब असणे, लग्न आणि साखरपुड्याच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे हा आपली संस्कृती आणि सभ्यतेचा भाग आहे. कदाचित देशात अजूनही लग्न करणे गुन्हा नाही. कुणाचा मित्र असणे आणि त्याच्या लग्नासाठी जाणे अद्यापही गुन्हा नाही.'
मोदींप्रमाणे न बोलावता पाकिस्तानात तर नाही गेले - सुरजेवाला
सुरजेवाला ट्विट करत म्हणाले, 'एखाद्याच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये उपस्थित राहण्यात गैर काय? संघाच्या लोकांना याची भीती का वाटते? संघाचे लोक खोटे का पसरवत आहेत? आपण सर्वच जण खाजगी कार्यक्रमांत सहभागी होत असोतो. एवढेच नाही, तर राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींप्रमाणे, न बोलावताच पाकिस्तानचा दौरा तर नाही केला. ते आपला मित्र असलेल्या एका देशात मित्राच्या लग्नात सहभागी होण्यासाठी गेले होते.'
Rahul Gandhi was at a nightclub when Mumbai was under seize. He is at a nightclub at a time when his party is exploding. He is consistent.
— Amit Malviya (@amitmalviya) May 3, 2022
Interestingly, soon after the Congress refused to outsource their presidency, hit jobs have begun on their Prime Ministerial candidate... pic.twitter.com/dW9t07YkzC
तत्पूर्वी मंगळवारी सकाळीच, भाजप नेते अमित मालवीय यांनी एक ट्विट करत, ' जेव्हा मुंबई सीज होती, तेव्हा राहुल गांधी नाइट क्लबमध्ये होते. जेव्हा त्यांच्या पक्षात स्फोटक स्थिती असते, तेव्हा ते असे करत असतात.' अमित मालवीय यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे.