Bharat Jodo Yatra: जानवं धारण केलेल्या मुलावरून राहुल गांधींची गोची, चुकीच्या पद्धतीनं घातल्यानं होत आहेत ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 03:28 PM2023-01-07T15:28:39+5:302023-01-07T15:29:59+5:30
'राजकारणासाठी 4 डिग्री तापमानात एका लहान मुलाला कपडे काढून फिरवायचे काम एक निर्लज्ज मनुष्यच करू शकतो.'
काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी हे त्यांच्या 'भारत जोडो यात्रे'मुळे सध्या सातत्याने चर्चेत आहेत. काँग्रेस पक्षही ट्विटर हँडलवरून त्यांच्या यात्रेचे पोटो पोस्ट करत असतो. पक्षाने नुकताच एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमुळे काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी चांगलेच ट्रोल होत आहेत. यानंतर तो फटो डिलिटही करावा लागला. या फोटोमध्ये राहुल गांधी जानवे घातलेल्या एका मुलाचा हात आपल्या हातात घेऊन चालताना दिसत आहेत. मात्र, या मुलाने जे जानवे धारण केले आहे, ते चुकीच्या पद्धतीने धारण केले आहे.
हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, एखादी व्यक्ती जानवे धारण करताना ते डाव्या खांद्यावरून उजवीकडे धारण करते. एखाद्या नातलगाच्या अंतिम संस्कारावेळीच ते विरुद्ध दिशेने धारण केले जाते. म्हणजेच, यावेळी ते व्यक्तीच्या उजव्या खांद्यावरून डावीकडे धारण केले जाते.
यासंदर्भात बोलताना भाजप नेते तजिंदर पाल सिंह बग्गा यांनी हा संकुचित राजकारणाचा भाग असल्याचे म्हटले आहे. 'राजकारणासाठी 4 डिग्री तापमानात एका लहान मुलाला कपडे काढून फिरवायचे काम एक निर्लज्ज मनुष्यच करू शकतो.'
काँग्रेसने हा फोटो ट्विट करताना, "निरागस पावले सोबत असताना पावले कशी थांबणार. भारत जोडो यात्रेने संकटाच्या बेड्या तोडल्या आहेत,' अशा आशचे भाष्य केले होते. यानंतर, हे ट्विट डेलीट करण्यात आले.