राहुल गांधींच्या 'या' फोटोनं वाढवली भाजपाची चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 02:41 PM2018-12-17T14:41:49+5:302018-12-17T14:44:21+5:30
विरोधकांचा 'प्रवास' मोदी आणि भाजपासाठी अडथळा ठरण्याची शक्यता
जयपूर: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचं मनोधैर्य उंचावलं आहे. यामुळे 2019 मध्ये भाजपाविरोधात महाआघाडी करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. आज तीन राज्यांमध्ये काँग्रेस नेत्यांचा शपथविधी आहे. या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व नेत्यांनी राहुल गांधींसह एकाच बसनं प्रवास केला. विरोधकांचा हा 'प्रवास' भाजपासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील भाजपाला रोखण्यासाठी विरोधी पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी महाआघाडी तयार करण्याचा विरोधकांचा मानस आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसनं जेडीएसच्या मदतीनं सत्ता स्थापन करत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला सत्तेपासून दूर ठेवलं. तेव्हापासून महाआघाडी करण्याच्या हालचाली सुरू आहेत. आज तीन राज्यांमध्ये काँग्रेस नेते मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. या कार्यक्रमांना विरोधी पक्षातील अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत.
Jaipur: Earlier visuals of Congress President Rahul Gandhi, former PM Manmohan Singh and other leaders going for the swearing-in ceremony of Rajasthan CM Ashok Gehlot and Deputy CM Sachin Pilot. pic.twitter.com/2CZiyAS8x3
— ANI (@ANI) December 17, 2018
राहुल गांधी सकाळी जयपूरला पोहोचले. त्यावेळी त्यांच्यासोबत अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी एकाच बसनं प्रवास केला. यामध्ये माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, एलजेडीचे नेते शरद यादव, डीएमके प्रमुख एम. के. स्टॅलिन, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांचा समावेश केला. विरोधकांच्या या वाढत्या जवळिकीमुळे भाजपाच्या चिंतेत भर पडणार आहे.