Congress: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना दिलासा, राजकीय निवृत्तीबाबत पक्षाने घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 05:26 PM2022-05-17T17:26:32+5:302022-05-17T17:26:51+5:30
Congress Leader Retirement Age: काँग्रेसने निवृत्तीचे वय ठरवले असते, तर सोनिया गांधी, मलीकार्जून खर्गे, गुलाम नबी आझाद, पी चिदंबरम, दिग्विजय सिंह यांच्यासारख्या नेत्यांवर निवृत्तीची टांगती तलवार आली असती.
नवी दिल्ली: नुकतेच काँग्रेसचे चिंतन शिबीर पार पडले. यात पक्षातील ज्येष्ठ नेत्यांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेस नेत्यांच्या निवृत्तीचे वय ठरवणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. पण, आता या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. काँग्रेसकडून नेत्यांच्या निवृत्तीचे वय ठरवले जाणार नाही. पण, आगामी निवडणुकांमध्ये 50 टक्के जागा तरुण नेत्यांना देण्याचा निर्णय झाला आहे.
पक्षातील अनेक नेत्यांचे वय 65 पेक्षा पुढे
पक्षाच्या युवा कार्य समितीने उदयपूर चिंतन शिबिरात 65 वर्षांवरील नेत्यांना सक्रिय राजकारणातून निवृत्तीची शिफारस केली होती, मात्र 50 टक्के पदे तरुणांसाठी राखीव झाल्यानंतर हा प्रस्ताव तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी या स्वतः 76 वर्षांच्या आहेत. पक्षाचे राज्यसभेतील नेते खर्गे यांचे वय 79 वर्षे आहे. गुलाम नबी आझाद, पी चिदंबरम, दिग्विजय सिंह, अंबिका सोनी यांच्यासह अनेक नेते म्हातारे झाले आहेत, ज्यांच्यावर निवृत्तीची टांगती तलवार होती. पण, आता मात्र ते सक्रिय राजकारणात राहू शकतात.
पक्षात मोठे बदल होणार
आपापल्या राज्यात मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या भूपिंदरसिंग हुड्डा आणि कमलनाथ यांच्यासारख्या नेत्यांनी वयाची 70 वर्षे ओलांडली आहेत. काँग्रेसमध्ये वयाच्या आधारावर निवृत्ती होणार नाही, पण कामगिरीच्या आधारावर पदावरून सक्तीची रजा दिली जाईल, असे शिबीरात ठरवले आहे. दिल्लीत बसून संघटनेचे सरचिटणीस प्रत्येक कार्यकर्त्यांच्या कामाचा आढावा घेतील आणि चांगले काम करणाऱ्याला बक्षीस मिळेल, पण वाईट काम करणाऱ्या नेत्याला कार्यमुक्त केले जाईल, असा निर्णय पक्षाने घेतला आहे. उदयपूर चिंतन शिबिरानंतर पक्षात मोठे बदल होणार असून, त्याअंतर्गत अनेक मोठी पावले उचलली जात आहेत.