“राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ‘भारत जोडो’ यात्रा काढावी”; CWC बैठकीत खरगेंचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 07:30 PM2023-12-21T19:30:23+5:302023-12-21T19:30:48+5:30
Congress CWC Meet: इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर आता काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक दिल्लीत झाली.
Congress CWC Meet ( Marathi News ): संसद सुरक्षा त्रुटी, खासदारांचे निलंबन यांवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. गृहमंत्री आणि पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही सभागृहात येऊन निवेदन, स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली आहे. संसदेतून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांचा आकडा आता १४६ वर गेला आहे. इंडिया आघाडीच्या दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर आता काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी समितीची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राहुल गांधी यांना पुन्हा एकदा भारत जोडो यात्रा काढण्याचा सल्ला दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा झालेला पराभव, खासदारांचे निलंबन यांसह अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत, पक्षाचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांना पुन्हा एकदा भारत जोडो यात्रा काढावी. दुसरी भारत जोडो यात्रा पूर्वेकडून पश्चिमकडे असावी, असा सल्ला मल्लिकार्जुन खरगे यांनी दिला आहे. काँग्रेस नेत्यांची तशी मागणी असल्याचे खरगे यांनी नमूद केले. तसेच अंतिम निर्णय राहुल गांधी यांचा असेल, असेही यावेळी स्पष्ट केले.
निवडणुकांचे निकाल निराशाजनक आहेत
नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल निराशाजनक आहेत. आम्ही आमच्या चुकांमधून शिकलो आहोत. त्यांची पुनरावृत्ती होणार नाही, यावर भर दिला जाणार आहे. लोकसभा निवडणूक फार दूर नाही, त्यामुळे आपण सर्वांनी आपापल्या कामांत व्यस्त झाले पाहिजे, अशा सूचना खरगे यांनी काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या. तसेच भविष्यातील राजकारणावर परिणाम करणारे प्रश्न आपण विसरू नये. जातिनिहाय जनगणना आणि महिला आरक्षण हे महत्त्वाचे मुद्दे असतील. महिला आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी आणि महिलांना आरक्षणाच्या कक्षेत आणावे, अशी आमची मागणी आहे. लोकसभा निवडणुकीसाठी ठोस रणनीती आखावी लागेल आणि समविचारी पक्षांसोबत काम करून जास्तीत जास्त जागा जिंकाव्या लागतील, असे खरगे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची नक्कल करणे आणि विरोधी खासदारांच्या निलंबनावरून झालेल्या वादाचा संदर्भ देत खरगे म्हणाले की, खासदारांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या घटनात्मक पदांवर असलेले लोक पक्षीय राजकारणाचा भाग म्हणून असे करत आहेत. जात, क्षेत्र आणि व्यवसायाची ढाल करून राजकारण करत आहेत. आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले आहेत, असा आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.