Rahul Gandhi : 'राहुल गांधींना विरोधी पक्षनेते करा', काँग्रेस CWC बैठकीत ठराव मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 03:03 PM2024-06-08T15:03:11+5:302024-06-08T15:10:57+5:30
शनिवारी काँग्रेस कार्यकारिणी आणि पक्षाच्या संसदीय पक्षाच्या बैठक पार पडल्या. या बैठकीत राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
Congress ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीत एनडीए'ला बहुमत मिळाले,नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, आज शनिवारी काँग्रेस कार्यकारिणी आणि पक्षाच्या संसदीय पक्षाच्या बैठक पार पडल्या. यावेळी राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यांनी राहुल गांधी यांना लोकसभेत पक्षाचे नेते म्हणून नियुक्त करण्याचा ठराव मंजूर केला आहे.
सीडब्लूसी बैठकीनंतर काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रमोद तिवारी म्हणाले की, राहुल गांधींनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते नक्कीच व्हायला हवे. आमच्या कार्यकारिणीची ही विनंती असल्याचे ते म्हणाले. राहुल गांधी निर्भय आणि धैर्यवान आहेत. यासोबतच काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर काँग्रेस पक्षाचे नेते के.सी. वेणुगोपाल म्हणाले की, आता काँग्रेस पक्षाचे पुनरुज्जीवन सुरू झाले आहे.
नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आणि देशातील जनतेचा आवाज व्हावे ही आमच्या कार्यकारिणीची इच्छा आहे. त्यांच्या जोरावर त्यांना सत्य जनतेसमोर आणण्याचे बळ मिळेल.
के.सी. वेणुगोपाल म्हणाले की, आता काँग्रेस पक्षाचे पुनरुज्जीवन सुरू झाले आहे. हा CWC चा आत्मा आहे. काँग्रेस कार्यकारिणीने एकमताने राहुल गांधींना लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याची विनंती केली आहे. संसदेत या मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी राहुल गांधी हे सर्वात योग्य व्यक्ती आहेत.
CWC (Congress Working Committee) members have passed the resolution that Rahul Gandhi should be appointed as the leader of the party in Lok Sabha: Sources pic.twitter.com/tm9w5R8igU
— ANI (@ANI) June 8, 2024
नरेंद्र मोदी 9 जूनला तिसऱ्यांदा घेणार PM पदाची शपथ
लोकसभा निवडणूक २०२४ च्या विजयानंतर, NDA संसदीय पक्षाचे नेते नरेंद्र मोदी रविवार सायंकाळी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी त्यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील NDA ने 293 जागा जिंकल्या आहेत. यात एकट्या भाजपच्या 240 जागा आहेत. या शपथ विधी समारंभासाठी बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ, मॉरीशस आणि सेशेल्सचे प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाच्या पाच कंपन्या, नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) कमांडो, ड्रोन आणि 'स्नायपर्स' तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, परदेशी पाहुणे राजधानीतील लीला, आयटीसी मौर्य, ताज, ओबेरॉय आणि क्लेरिजेस हॉटेल्समध्ये थांबणार आहेत. यामुळे हे हॉटेल्स देखील सुरक्षेच्या कक्षेत घेण्यात आले आहेत.