Congress CWC Meeting : आणखी एक वर्ष सोनिया गांधीच राहणार 'बॉस', अध्यक्ष होण्याच्या मांगणीवर राहुल गांधींनी दिलं असं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 05:23 PM2021-10-16T17:23:36+5:302021-10-16T17:24:27+5:30
अंबिका सोनी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, ''ते (राहुल गांधी) पक्षाचे अध्यक्ष होतील की नाही, हा निर्णय त्यांच्यावर आहे, यासाठी सर्वांचे एकमत आहे.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणूक-2019 मध्ये दारूण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर आता ते पुन्हा काँग्रेसची सूत्रे हाती घेतील का? यासंदर्भात, काँग्रेस कार्यकारिणीने (CWC) हा निर्णय स्वतः राहुल गांधी यांच्यावरच सोपवला आहे. शनिवारी झालेल्या या बैठकीनंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्या अंबिका सोनी म्हणाल्या, सर्वांचे एकमत आहे, पण निर्णय ते स्वतःच घेतील. एवढेच नाही, तर पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यात संघटनेंतर्गत निवडणुकीची प्रक्रियाही सुरू होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. याच बरोबर, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षातील नेत्यांनी केलेल्या मागणीवर आपण विचार करू, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. (Congress CWC meeting)
अंबिका सोनी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, ''ते (राहुल गांधी) पक्षाचे अध्यक्ष होतील की नाही, हा निर्णय त्यांच्यावर आहे, यासाठी सर्वांचे एकमत आहे. राहुल गांधी यांनीच पक्षाचे अध्यक्ष व्हावे, अशी इच्छा सर्वांनीच व्यक्त केली आहे.'' राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष झाल्या आहेत. यानंतर, कपिल सिब्बल यांच्यासह अनेक नेत्यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून निवड न झाल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे. ज्या 23 नेत्यांनी संघटनेच्या निवडणुकांबाबत सोनिया गांधींना पत्र लिहिले आहे त्यांना G-23 म्हटले जाते.
एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, सीडब्ल्यूसी बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मागणीवर राहुल गांधी म्हणाले, की ते या प्रस्तावावर विचार, करतील. तसेच, आपल्याला विचारधारेवर पक्षाच्या नेत्यांकडून स्पष्टता हवी आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले की. याशिवाय, काही नेत्यांनी असेही म्हटले आहे, की निवडणुकीपर्यंत त्यांना अंतरिम अध्यक्ष बनवावे.