Congress: काँग्रेसच्या अध्यक्षांची निवड १७ ऑक्टोबरला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 06:31 AM2022-08-29T06:31:59+5:302022-08-29T06:32:52+5:30
Congress: काँग्रेसने नवा अध्यक्ष निवडण्यासंबंधी विस्तृत कार्यक्रमाची रविवारी घोषणा केली. त्यानुसार २४ सप्टेंबरपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल; तर, एकापेक्षा अधिक उमेदवार असल्यास १७ ऑक्टोबरला निवडणूक होईल
नवी दिल्ली : काँग्रेसने नवा अध्यक्ष निवडण्यासंबंधी विस्तृत कार्यक्रमाची रविवारी घोषणा केली. त्यानुसार २४ सप्टेंबरपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल; तर, एकापेक्षा अधिक उमेदवार असल्यास १७ ऑक्टोबरला निवडणूक होईल.
पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या (सीडब्ल्यूसी) ऑनलाइन बैठकीत केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाकडून सादर झालेल्या निवडणूक कार्यक्रमास मंजुरी देण्यात आली. बैठकीनंतर पक्षाचे केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांनी पत्रकारांना सांगितले की, निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २४ सप्टेंबरला सुरू होईल. तर, अखेरची तारीख ३० सप्टेंबर असेल. या काळात सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत अर्ज दाखल करता येतील. अर्जाची छाननी १ ऑक्टोबर रोजी होईल. तर, ८ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील.
पक्षाचे सरचिटणीस वेणुगोपाल यांनी सांगितले की, निवडणूक कार्यक्रमाला सर्वांच्या सहमतीने मंजुरी देण्यात आली. ४ सप्टेंबर रोजी दिल्लीत महागाईवर हल्लाबोल रॅली आयोजित करणे आणि ७ सप्टेंबर रोजी भारत जोडो यात्रा सुरू करण्याचा संकल्प काँग्रेस कार्यकारिणीने केला.
९००० पेक्षा अधिक जण करणार मतदान
- एकापेक्षा अधिक उमेदवार असतील तर १७ ऑक्टोबर रोजी निवडणूक होईल.
- मतदान सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत होईल. १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणीनंतर निकाल जाहीर केला जाईल.
- काँग्रेस अध्यक्ष निवडण्यासाठी ९००० पेक्षा अधिक प्रतिनिधी मतदान करतील.