काँग्रेसला सतावतेय आर्थिक चणचण; फंड उभारण्याचे नेते, पदाधिकाऱ्यांना आवाहन
By देवेश फडके | Updated: February 20, 2021 17:48 IST2021-02-20T17:47:00+5:302021-02-20T17:48:44+5:30
देशातील सर्वांत जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला आर्थिक चणचण भासत असल्याची माहिती मिळाली आहे. काँग्रेसला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून, यासाठी एक बैठक घेण्यात आली. काँग्रेसची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट असून, या बैठकीत निधी उभारण्यावर चर्चा करण्यात आल्याचे समजते.

काँग्रेसला सतावतेय आर्थिक चणचण; फंड उभारण्याचे नेते, पदाधिकाऱ्यांना आवाहन
नवी दिल्ली : देशातील सर्वांत जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला आर्थिक चणचण भासत असल्याची माहिती मिळाली आहे. काँग्रेसला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून, यासाठी एक बैठक घेण्यात आली. काँग्रेसची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट असून, या बैठकीत निधी उभारण्यावर चर्चा करण्यात आल्याचे समजते. (congress facing huge financial crisis discussed in aicc meeting)
मिळालेल्या माहितीनुसार, २०१४ मध्ये देशात सत्ताबदल होऊन भाजप सरकार आल्यापासून काँग्रेसला आर्थिक चणचण भासायला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने फंड उभारण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेस पक्षाच्या पार पडलेल्या बैठकीत निधी आणि फंड उभारण्यासाठी नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन करण्यात आले. यासंदर्भात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगड आणि पंजाबमधील काही नेत्यांशी चर्चा करून तसेच भेटी घेऊन या संकटाच्या परिस्थितीत मदत करण्याचे आवाहन केले आहे.
'महागाईचा विकास'; इंधनदरवाढीवरून राहुल गांधींची मोदी सरकारवर खोचक टीका
सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसची बैठक पक्ष मजबूत करण्यासाठी घेण्यात आल्याचे सांगितले गेले होते. मात्र, या बैठकीत पक्षाच्या आर्थिक संकटाविषयी चर्चा करण्यात आली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलेल्या सूचनेवरून काँग्रेसच्या ज्येष्ठ मंडळींनी पंजाब आणि महाराष्ट्रातील नेत्यांना पक्षाच्या गंभीर आर्थिक परिस्थितीविषयी माहिती दिली. काँग्रेसच्या एका नेत्यानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
काँग्रेस नेत्याचा दुजोरा
काँग्रेसच्या पार पडलेल्या बैठकीत आर्थित स्थितीवर चर्चा करण्यात आल्याचे या काँग्रेसच्या नेत्याने सांगितले. त्याचप्रमाणे दिल्लीत तयार होत असलेल्या पक्षाच्या मुख्यालयासंदर्भातही या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे ते म्हणाले. गेल्या काही वर्षांपासून मुख्यालयाचे काम सुरूच असून, अद्यापही अपूर्ण राहिल्याने काँग्रेस नेत्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली आहे.
निवडणुकांची चिंता
आगामी कालावधीत केरळ, आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये काँग्रेसला पूर्ण ताकदीनिशी लढायचे असेल, तर पैशाची व्यवस्था करावीच लागेल. आताच्या घडीला काँग्रेस पक्षात निधी आणि फंड उभा करणे हा महत्त्वाचा मुद्दा झाला आहे, असेही एका काँग्रेसच्या नेत्याने सांगितले.