मध्य प्रदेशात असंतोष, नाराजीचा लाभ उठवण्यात काँग्रेसला अपयश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 04:31 AM2018-12-12T04:31:34+5:302018-12-12T06:36:35+5:30
शेतकऱ्यांमधील नाराजी, शेती मालाला न मिळणारे भाव, वाढती बेरोजगार, व्यापम घोटाळा याविषयी ग्रामीण जनतेत मोठी नाराजी होती. त्याचा लाभ उठवत भाजपा सरकार सत्तेतून बाहेर करण्याची संधी काँग्रेसला होती.
- असिफ कुरणे
शेतकऱ्यांमधील नाराजी, शेती मालाला न मिळणारे भाव, वाढती बेरोजगार, व्यापम घोटाळा याविषयी ग्रामीण जनतेत मोठी नाराजी
होती. त्याचा लाभ उठवत भाजपा सरकार सत्तेतून बाहेर करण्याची संधी काँग्रेसला होती. पण भाजपाने आपली मध्य प्रदेशात अजूनही पकड मजबूत असल्याचे दाखवून दिले.
१५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपाविरोधात काँग्रेसने निवडणुकीच्या वर्षभर आधी तयारी सुरू केली होती. दिग्विजय सिंग, कमलनाथ, ज्योतिरादित्य सिंधिया, सुरेश पचौरीसारख्या ज्येष्ठ नेत्यांमधील वाद मिटवत त्यांना एकत्र आणण्याचे काम राहुल गांधी यांनी केले. तिकीटवाटपाचे नियोजन करत बंडखोरी टाळण्यात काँग्रेसने यश मिळवले होते. त्याचा फायदा पक्षाला झाला. चंबळ, माळवा भागात काँग्रेसला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले. काँग्रेस या निवडणुकीत जवळपास ८० जागा नव्याने पटकावण्याच्या स्थितीत पोहोचले आहेत. यातील ७७ जागा या भाजपाच्या आहेत. ग्रामीण जनतेमध्ये असलेला असंतोष काँग्रेसने बरोबर मतपेटीपर्यंत आणला. जवळपास ४८ जागा या ग्रामीण आणि आदिवासी बहुल भागातून मिळाल्या आहेत.
शिवराज सिंह चौहान यांनी सरकारविरोधातील नाराजीचा फार मोठा फटका बसणार नाही यासाठी परिश्रम घेतले. विरोधकांचा एकहाती सामना करत सत्ता कायम ठेवण्यापर्यंत मजल मारली आहे. त्यांनी केलेल्या विकासकामांच्या बळावर माळवा, बालाघाट परिसरात भाजपाला चांगले यश मिळाले. शहरी मतदारांनी त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांना साथ दिल्याचे चित्र दिसत होते. त्यांच्या व्यतिरिक्त अनेक मंत्री, आमदार, नेते पराभवाच्या छायेत होते. शिवराज सिंह यांच्या कामामुळे भाजपाची फारशी वाताहत झाली नाही.
निकालाची कारणे...
निवडणूक एवढी अटीतटीची होती की जवळपास ७८ उमेदवार २००० पेक्षा कमी मतांनी विजयी झाले आहेत. शेवटच्या फेरीपर्यंत विजयाचे पारडे वरखाली होत होते.
भाजपा व संघाच्या कार्यकर्त्यांची सक्षम फळी मतांची बेगमी करण्यात कामी आली. विकासाचा मुद्दा आक्रमकपणे मांडण्याची गरज होती.
शिवराज सिंह चौहान सरकारमधील ९ पेक्षा जास्त मंत्री पिछाडीवर किंवा पराभवाच्या छायेत उभे आहेत.