आता लढायचं! पराभव विसरुन काँग्रेसचं आता गुजरातवर लक्ष, राहुल गांधींची बैठक; BJP-AAP ला रोखण्यासाठी मास्टरप्लान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 08:54 PM2022-03-22T20:54:42+5:302022-03-22T20:55:08+5:30

गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत सर्वच पक्षांनी जोरदार तयारी जोरात सुरू केली आहे.

Congress focus on Gujarat Rahul Gandhi meeting with party leaders made strategy on BJP AAP | आता लढायचं! पराभव विसरुन काँग्रेसचं आता गुजरातवर लक्ष, राहुल गांधींची बैठक; BJP-AAP ला रोखण्यासाठी मास्टरप्लान

आता लढायचं! पराभव विसरुन काँग्रेसचं आता गुजरातवर लक्ष, राहुल गांधींची बैठक; BJP-AAP ला रोखण्यासाठी मास्टरप्लान

Next

गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत सर्वच पक्षांनी जोरदार तयारी जोरात सुरू केली आहे. पाच राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसनं आता आपलं लक्ष गुजरातकडे वळवलं आहे. पाच राज्यांतील पराभव विसरून पक्षानं आता गुजरातवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. यामुळेच मंगळवारी माजी काँग्रेस अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी गुजरात काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत भाजपचा मुकाबला आणि आम आदमी पक्षाला (आप) रोखण्यासाठी रणनीती तयार करण्यात आली. 

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत भाजपसोबतच 'आप'च्या विरोधात आक्रमक प्रचार करण्याचं ठरविण्यात आलं आहे. सभापती आणि विधिमंडळ पक्षनेते यांची नुकतीच निवड करण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. अशा परिस्थितीत आता काँग्रेस लवकरच संघटना वाढवून लोकांना 'आप' किंवा भाजपमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी काम करेल. अनेक राज्यांमध्ये पक्षांतरामुळे काँग्रेसचं मोठं नुकसान झालं आहे. अशा स्थितीत पक्षानंही मागील चुकांमधून धडा घेण्यास सुरुवात केली आहे. ६ एप्रिल रोजी साबरमती आश्रमापासून सुरू होणाऱ्या यात्रेत सहभागी होण्यासाठी राहुल यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. यातून निवडणुकीत भाजपच्या विरोधात वातावरण तयार केलं जाईल आणि 'आप'ला रोखण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.

'आप'विरोधात काँग्रेसही आक्रमक होणार
काँग्रेस दिल्ली आणि पंजाबमधून नेते आणि कार्यकर्त्यांना गुजरातमध्ये पाठवणार असल्याचं बैठकीत ठरविण्यात आलं आहे. यासह ते 'आप'च्या उणिवा सर्वांसमोर आणण्याचं काम करणार आहेत. यासाठी व्हिडिओ क्लिप, घोषणा इत्यादींचा वापर केला जाईल. यावेळच्या निवडणुकीत काँग्रेसही 'आप'च्या विरोधात जोरदार प्रचार करणार आहे. भाजपची बी टीम म्हणून 'आप' विरोधात आक्रमक प्रचार केला जाणार आहे. या बैठकीत भाजपविरोधातील जनतेच्या प्रश्नांची यादी आतापासूनच तयार करण्याच्या सूचना नेत्यांना देण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या काळात भाजपला घेरता यावं, यासाठी ते मुद्दे वेळोवेळी मांडणे हा त्यामागचा हेतू आहे.

निवडणुकीतील पराभवातून घेतला धडा
गुजरात काँग्रेस नेत्यांच्या या बैठकीत यावेळी भाजपला अधिक आक्रमकतेनं घेरण्यात येणार असल्याचं ठरविण्यात आलं आहे. काँग्रेसचे नेते आधी आदिवासींच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित करतील. याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. यासाठी नदीजोड प्रकल्पांना विरोध करणाऱ्या आदिवासींना काँग्रेस भक्कम पाठिंबा देईल, असं सांगण्यात आलं आहे. भाजपविरुद्ध सलग निवडणूक पराभव आणि पंजाबमध्ये 'आप'चा उदय झाल्यानंतर काँग्रेसला आता दुहेरी रणनीतीवर काम करणं भाग पडलं आहे. त्यामुळे आता त्या दिशेने पावले टाकण्याची तयारी सुरू आहे.

Web Title: Congress focus on Gujarat Rahul Gandhi meeting with party leaders made strategy on BJP AAP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.