काँग्रेसचा ‘हात’च देशाला मार्ग दाखवेल; दिल्लीत पक्षाच्या अधिवेशनाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 06:08 AM2018-03-18T06:08:48+5:302018-03-18T06:08:48+5:30
समाजाची जात, धर्म, पंथ, प्रांत अशी विभागणी केली जात आहे, भांडणे लावली जात आहेत, असा आरोप मोदी सरकारवर करतानाच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसचा ‘हात’च देशाला व लोकांना एकमेकांशी जोडण्याचे काम करेल, असा दावा पक्षाच्या अधिवेशनात केला.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : समाजाची जात, धर्म, पंथ, प्रांत अशी विभागणी केली जात आहे, भांडणे लावली जात आहेत, असा आरोप मोदी सरकारवर करतानाच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसचा ‘हात’च देशाला व लोकांना एकमेकांशी जोडण्याचे काम करेल, असा दावा पक्षाच्या अधिवेशनात केला. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसमुक्त भारताची भाषा करतात. पण आम्ही सूड व अहंकारमुक्त भारत बनवू इच्छितो, अशा शब्दांत सरकारवर हल्ला चढवला.
पक्षाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात राहुल गांधी यांनी मोदी यांच्या वारेमाप आश्वासनांची खिल्ली उडवली. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव कुठे मिळाला? युवकांच्या रोजगाराचे काय झाले? हे ज्वलंत प्रश्न असल्याचे सांगून ते म्हणाले की, केवळ काँग्रेसच प्रश्न सोडवण्याचा मार्ग दाखवू शकतो. ते द्वेषाचे राजकारण करतात, तर आम्ही प्रेमाचे. हा देश प्रत्येक जात, धर्माचा असून सर्वांना एकत्र घेऊन काँग्रेस पुढे चालत राहील. राहुल गांधी समारोपाचे भाषण सविस्तर करणार आहेत.
सोनिया गांधी यांनी भाषणाची सुरुवातच मोदी यांच्यावरील हल्ल्याने केली. ते काँग्रेसला नष्ट करू इच्छितात. पण लोकांच्या मनात काँग्रेसबद्दल काय भावना आहे, याचा पुरावा गुजरात तसेच राजस्थान व मध्य प्रदेशसह अन्य पोटनिवडणुकांच्या निकालांनी दिला आहे, असे गांधी म्हणाल्या.
सोनिया गांधी पक्षाध्यक्ष नसल्या तरी त्यांचे भाषण सुरू होताच ‘सोनिया गांधी झिंदाबाद’च्या जोरदार घोषणा सुरू झाल्या. राहुल गांधी यांच्यासाठीही इतक्या घोषणा दिल्या गेल्या नाहीत.
नेते व्यासपीठावर नाहीत
या महाअधिवेशनात बराच
बदल दिसत होता. आतापर्यंत कार्यकारिणीचे सदस्य, पक्षाच्या अध्यक्षांसह अन्य नेते व्यासपीठावर असत. परंतु, ही परंपरा बाजूला सारून व्यासपीठावर फक्त संबंधित वक्ता असेल, अशी व्यवस्था केली होती.
तरुणांना पुढे आणणार
पक्षामध्ये आता तरुणांना पुढे आणले जाईल. मात्र वरिष्ठ नेत्यांशिवाय पक्ष चालवणे शक्य नसून, वरिष्ठ व तरुण नेते यांना जोडण्याचे काम करण्याची माझी जबाबदारी आहे, असे राहुल म्हणाले. राजकीय व कृषी प्रस्तावावर बोलणारे ८० टक्के वक्ते तरुण होते. यापुढे काँग्रेसची सूत्रे तरुणांच्या हाती असतील, असा संदेश देण्यात आला.