जो खेळ तुम्ही सुरु केलाय तो मीच संपवणार; शिवराज सिंह यांचा काँग्रेसला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 11:14 AM2019-07-28T11:14:07+5:302019-07-28T11:15:07+5:30
काँग्रेसने सपा आणि बसपा यांच्या मदतीने मध्य प्रदेशात सरकार बनविलं आहे. भाजपाला काँग्रेसपेक्षा कमी जागा मिळाल्या म्हणून आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं असतानाही आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी दावा केला नाही
भोपाळ - मागील आठवड्यात मध्य प्रदेशात एका विधेयकाच्या चर्चेदरम्यान दोन भाजपा आमदारांनी पक्षाची साथ सोडत काँग्रेस सरकारच्या बाजूने मतदान केलं होतं. त्यामुळे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान चांगलेच संतापले आहेत. जर भाजपाने मनात आणलं असतं तर राज्यात काँग्रेसला सरकार बनविता आलं नसतं असा इशारा शिवराज सिंह चौहान यांनी दिला आहे.
भाजपाच्या दोन आमदारांनी पक्षाची साथ सोडत काँग्रेसला मतदान केलं. त्यामुळे शिवराज सिंह यांनी संकल्प करत सांगितले की, जो खेळ काँग्रेसने सुरु केला आहे तो खेळ मीच संपवणार असल्याचं ते म्हणाले. भाजपाच्या नेत्यांकडून पक्ष सदस्य नोंदणी मोहिमेची सुरुवात करण्यात आली त्यात ते बोलत होते.
यावेळी बोलतान शिवराज सिंह चौहान पत्रकारांशी बोलले की, जर आम्ही मनात आणलं असतं तर राज्यात काँग्रेसला सरकार स्थापन करण्यात आलं नसतं. काँग्रेसने सपा आणि बसपा यांच्या मदतीने मध्य प्रदेशात सरकार बनविलं आहे. भाजपाला काँग्रेसपेक्षा कमी जागा मिळाल्या म्हणून आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं असतानाही आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी दावा केला नाही. आम्ही विरोधी पक्षात बसणं पसंत केलं. राज्यात काँग्रेस सरकार आल्यापासून भ्रष्ट कारभाराशिवाय काहीच केलं नाही. आम्ही कधी त्या सरकारला त्रास देण्याचा प्रयत्न केला नाही पण काँग्रेसने जो खेळ सुरु केला आहे तो मी संपवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
24 जुलै रोजी मध्य प्रदेश विधानसभेत मांडण्यात आलेल्या ठरावाला पाठिंबा देत भाजपाच्या दोन आमदारांनी काँग्रेसला मतदान केलं. इतकचं नाही तर काँग्रेसने भाजपाचे अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. कर्नाटकानंतर आता मध्य प्रदेशातही राजकीय संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पार्टीच्या नेत्यांमध्ये मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकारवरुन वादावादी सुरु आहे. भाजपा जर कमलानाथ सरकारला कर्नाटक सरकारसारखे असल्याचे समजत असेल, तर ती त्यांची चूक आहे असं काँग्रेसने म्हटलं आहे.