Congressला अध्यक्ष निवडीसाठी अखेर मुहुर्त मिळाला, पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यात होणार निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 01:55 PM2021-10-16T13:55:48+5:302021-10-16T13:57:47+5:30
Congress News: आज दिल्लीमध्ये सुरू असलेल्या Congressच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. Sonia Gandhi .यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीच्या तारखेची घोषणाही झाली आहे.
नवी दिल्ली - आज दिल्लीमध्ये सुरू असलेल्या काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीच्या तारखेची घोषणाही झाली आहे. पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडल्यानंतर सोनिया गांधी ह्या हंगामी अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा अशी मागणी काही नेत्यांकडून होत आहे. तसेच पक्षाला अध्यक्ष नसल्याने निर्णय कोण घेत आहे हे कळायला मार्ग नाही, अशी टीका काही दिवसांपूर्वी जी-२३ मधील नेते कपिल सिब्बल यांनी केली होती. त्यानंतर अखेर आज कार्यकारी समितीच्या बैठकीत अध्यक्षपदाच्या निवडणुकीविषयी मोठी घोषणा झाली आहे. त्यानुसार पुढीलवर्षी सप्टेंबर महिन्यात काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवड होणार आहे.
Elections for Congress president to be held in September 2022: Sources pic.twitter.com/UBVtIHw1rA
— ANI (@ANI) October 16, 2021
दरम्यान, कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये सोनिया गांधींनी पक्षातील जी-२३ नेत्यांना स्पष्ट आणि सूचक संदेश दिला आहे. पक्षाची पूर्णवेळ अध्यक्षा मीच आहे, असे सोनिया गांधींनी स्पष्ट केले आहे. सोनिया गांधी यांनी पक्षातील असंतुष्ट नेत्यांचा गट असलेल्या जी-२३ ला हे खरमरीत उत्तर दिले आहे. सोनिया गांधी यांनी बैठकीच्या सुरुवातील उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, जर तुम्ही मला असे सांगण्याची परवानगी दिली तर मी सांगते की, मीच काँग्रेसची पूर्णवेळ अध्यक्षा आहे. माझ्यासाठी माध्यमांच्या माध्यमातून बोलण्याची गरज नाही. काही दिवसांपूर्वी कपिल सिब्बल यांनी पक्षामध्ये निर्णय कोण घेत आहे, हे समजत नसल्याचे विधान केले होते.
सोनिया गांधी म्हणाल्या की, आम्ही कधीही लोकमहत्त्वाच्या मुद्द्यांवर टिपणी करण्यास नकार दिलेला नाही. यावेळी पक्ष संघटनेच्या निवडणुकीबाबतही सोनिया गांधी यांनी भाष्य केले. पक्ष संघटनेच्या निवडणुकीचा पूर्ण आराखडा तुमच्यासमोर येणार आहे, असे त्यांनी सांगितले.