घराणेशाहीच्या जाळ्यातून बाहेर पडण्याची काँग्रेसला संधी !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 11:08 AM2019-06-08T11:08:20+5:302019-06-08T11:09:26+5:30
सत्ताधारी भारतीय जनता पक्षात सध्या मोठ्या प्रमाणात नेत्यांची आवक सुरू आहे. त्यामुळे स्वपक्षातील निष्ठावंतांचे नियोजन करण्याचे आव्हान भाजपसमोर येणाऱ्या काळात उभे राहण्याची शक्यता आहे.
- रवींद्र देशमुख
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उदयानंतर देशातील राजकारण कधीही कल्पना केली नव्हती, अशा वळणावर येऊन ठेपले आहे. भ्रष्टाचार आणि भारतीय राजकारणात रुजलेल्या घराणेशाहीला पोषक असलेले वातावरणच मोदीच्या उदयाने नाहीसे केले. त्यामुळेच २०१४ पासून कधी नव्हे ते एवढ्या मोठ्या प्रमाणात पक्षांतर सुरू झाले, ते आज तागायत सुरू आहे.
राजकीय क्षेत्रात झालेली ही उलथापालथ राजकारणाची दिशा आणि दशा बदलणारी ठरणार, असा अंदाज व्यक्त होत आहे. देशातील सर्वात मोठा आणि सर्वात जुना पक्ष म्हणून ओळख असलेल्या काँग्रेससमोर जुनी माणसं टिकविण्याचं आव्हान आहे. त्याचवेळी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची नामी संधी देखील आहे. परंतु, काँग्रेस कोणता पर्याय निवडणार, की दोन्ही पर्यायांसह पुढे जाणार हे येणारा काळाच ठरवणार आहे. राजकारणातील दिग्गज घराणे सध्या पक्षांतरावर भर देत आहेत. सत्तेची सवय सोडवत नसल्याने पद मिळाले नाही, तरी चालेल पण उभा केलेलं साम्राज्य कायम राहावे या लालसेपोटी कथित दिग्गजांच पक्षांतर जोरात सुरू आहे. त्यामुळे २०२४ पर्यंत काँग्रेस रिकामं होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केल्यास, राजकारणातील चाणक्य शरद पवार यांनी काळाची पावलं वेळीच ओळखल्याचं दिसतं. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अनेक तरुण चेहऱ्यांना संधी दिली. त्यात अगदी त्यांच्या नातवाचा देखील समावेश होता. परभणी, बीड, मावळ, शिरूर या मतदार संघात तरुणांना संधी देऊन पक्षाभोवती तरुणांची तटबंदी उभारण्यास पवारांनी सुरुवात केली. यात भर म्हणजे लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर तरुणांना आणखी संधी देण्यावर भर असेल असे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले. त्याचवेळी मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये अशा काही हालचाली दिसत नाहीत.
सत्ताधारी भारतीय जनता पक्षात सध्या मोठ्या प्रमाणात नेत्यांची आवक सुरू आहे. त्यामुळे स्वपक्षातील निष्ठावंतांचे नियोजन करण्याचे आव्हान भाजपसमोर येणाऱ्या काळात उभे राहण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक नेत्यांचे तिकीट कापून बाहेरून आलेल्यांना भाजपने संधी दिली आहे. यावेळी विद्यमान खासदारांची नाराजी मोडून काढण्यात भाजपला यश आले असले तरी हा फंडा नेहमीच चालणार नाही हे पक्षातील 'थिंकटँक'ला चांगलेच ठावूक आहे. पक्षात नाराजांची संख्या वाढल्यास आपोआपच संघटनावर परिणाम होण्यास सुरुवात होते. त्यामुळे स्वपक्षातील निष्ठावंतांना अधिकाधिक संधी देऊन पक्ष वाढविण्यावर भाजपला भर द्यावा लागणार आहे. त्यामुळे येथे निष्ठावंतांना अधिक संधी मिळण्यास वाव आहे.
स्वातंत्र लढ्याचा इतिहास असलेल्या काँग्रेसमधून अनेक नेते पक्षांतर करत आहेत. सर्वात जुन्या पक्षावर अशी वेळ येण्याची कारणं पक्ष नेतृत्वाला सापडलीच आहेत. किंबहुना तसे संकेतही त्यांनी दिले. स्वर्गात जायचं तर आधी मरावं लागतं, या युक्तीप्रमाणे काँग्रेस नेतृत्वाने पावले उचलत पदाचा राजीनामा पक्षाकडे सोपविला. परंतु, पक्ष संघटनेने त्यास नकार दिला. त्यामुळे काँग्रेसमध्ये आगामी काळात घराणेशाहीचा बिमोड होण्याची शक्यता असली तरी सुरुवात मुळापासून केल्याशिवाय हे शक्य होणार नाही, हे देखील तेवढच खरं आहे. गांधी कुटुंबाव्यतिरिक्त पक्षाध्यक्ष शोधण्याच्या सूचना राहुल गांधी यांनी नेत्यांना केल्या आहेत. त्यामुळे सलग १० वर्षांसाठी विरोधी बाकावर बसण्याची नामुष्की ओढावलेल्या काँग्रेसकडे तरुणांना सोबत घेऊन पक्ष वाढविण्याची संधी आहे. तर राजकारणात येऊ पाहणाऱ्या तरुणांसाठी काँग्रेसमध्ये येणार काळ खडतर असला तरी स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी ही योग्य वेळ ठरू शकतो.