प्रमुख विरोधी चेहऱ्यांना सोबत घेत काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा २.०' ची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 08:35 AM2023-12-20T08:35:56+5:302023-12-20T09:27:29+5:30
भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा ७ सप्टेंबर २०२२ रोजी तामिळनाडूच्या कन्याकुमारी इथून झाला होता.
नवी दिल्ली - आगामी २०२४ लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं विरोधी पक्षांनी भाजपाला मात देण्याची रणनीती आखली आहे. विरोधकांनी INDIA आघाडी बनवत सर्व राज्यात मजबूतीने निवडणूक लढण्याची तयारी केलीय. आता काँग्रेस जानेवारी २०२४ च्या पहिल्या आठवड्यानंतर भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू करू शकते. राहुल गांधींच्या नेतृत्वात निघालेल्या या यात्रेमुळे काँग्रेसला प्रचंड यश मिळाले. त्याचा लोकसभा निवडणुकीतही फायदा उचलण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यामुळे भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचे नियोजन करण्यात काँग्रेस नेते व्यस्त आहेत.
सूत्रांनुसार, राहुल गांधींच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा २.० हायब्रिड मोडवर असेल. ज्यात पदयात्रेसोबतच वाहनांचा उपयोग केला जाईल. यात्रेसाठी २ मार्ग शोधले जात आहेत. जर ते अंतिम झाले तर त्याची सुरुवात पूर्वोत्तर राज्यातून केली जाईल. यंदा रॅलीचे फोकस उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रावर असल्याचे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले. निवडणुकीपूर्वीची ही यात्रा असल्याने त्यात विरोधी पक्षातील प्रमुख चेहरेही सहभागी होतील. २१ डिसेंबरपासून होणाऱ्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत या यात्रेच्या नियोजनावर चर्चा होणार आहे.
भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा ७ सप्टेंबर २०२२ रोजी तामिळनाडूच्या कन्याकुमारी इथून झाला होता. जानेवारी २०२३ मध्ये जम्मू काश्मीरच्या श्रीनगर येथे ही यात्रा संपली होती. यावेळी राहुल गांधींनी जवळपास ४८०० किमी अंतर कापले होते. या १२६ दिवसांत १२ राज्यातील ७५ जिल्ह्यातून ही यात्रा मार्गस्थ झाली होती. भारत जोडो यात्रा ही भारतातील सर्वात मोठी पदयात्रा ठरली होती. अनेकदा गुडघ्यांना होणाऱ्या त्रासामुळे राहुल गांधींना चालण्यास अडथळा येत होता. परंतु जनतेच्या प्रेमामुळे ही यात्रा पूर्ण झाली असं राहुल गांधी सांगतात. त्यामुळे आता ही यात्रा हायब्रिड मोडवर काढण्यात येईल जेणेकरून राहुल गांधींसह इतर नेत्यांनाही त्याचा त्रास होणार नाही.
भारत जोडो यात्रेच्या पहिल्या टप्प्यात राहुल गांधींसोबत अनेक क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते. त्यात कमल हसन, पूजा भट्ट, रिया सेन, स्वरा भास्कर, रश्मी देसाई, आकांक्षा पुरी आणि अमोल पालेकरसारख्या टीव्ही आणि फिल्म जगतातील लोक होते. त्याचसोबत माजी लष्कर प्रमुख दीपक कपूर, निवृत्त नौदल प्रमुख एल रामदास, माजी आरबीआय गर्व्हनर रघुराम राजनसारखे विचारवंत आणि निवृत्त अधिकारीही सहभागी झाले होते.राजकीय नेत्यांमध्ये फारूख अब्दुला, मेहबुबा मुफ्ती, आदित्य ठाकरे, प्रियंका चतुर्वेदी, संजय राऊत, सुप्रिया सुळे हेदेखील यात्रेत चालले होते.