"देशात लोकशाहीची मोडतोड करण्याचं काम काँग्रेसकडून सुरूय"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 03:34 PM2023-04-05T15:34:08+5:302023-04-05T15:34:45+5:30
देशातील लोकशाही धोक्यात आल्याची टीका काँग्रेससह इतरही विरोधी पक्षांकडून सातत्याने होत आहे
मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजप विरोधी पक्ष काँग्रेसवर हल्लाबोल करत आहे. भाजपने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात 'वीर सावरकर गौरव यात्रा' काढण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी ही यात्रा नागपूर येथे झाली. या दौऱ्यादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना टोला लगावला. तर, केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीही राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींकडून देशातील लोकशाहीची मोडतोड केली जातेय, अशी टीका शिंदे यांनी केली.
देशातील लोकशाही धोक्यात आल्याची टीका काँग्रेससह इतरही विरोधी पक्षांकडून सातत्याने होत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत मोदी सरकार विरोधी पक्षातील नेत्यांना टार्गेट करत आहे. तसेच, विरोधकांकडून निवडणूक आयोग व न्याय व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यातच, सुरतच्या कोर्टाने राहुल गांधींनी २ वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस आणखी आक्रमक झाली असून मोदींकडून लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, भाजप नेते ज्योतिर्रादित्य शिंदे यांनी राहुल गांधीच लोकशाहीची मोडतोड करत असल्याचं म्हटलंय.
गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने न्यायपालिकेवर दबाव टाकण्याच्या आणि धमकीच्या विचारधारेचं समर्थन केलंय. आपल्या व्यक्तिगत कायदेशीर लढाईली लोकशाहीची लढाई असल्याचे सांगत प्रमोट करण्याचा प्रयत्न केलाय. त्यावरुन, एक गोष्ट निश्चितच स्पष्ट होते की, काँगेस पक्षच या देशात लोकशाहीची मोडतोड करण्यात कुठलीही कमी ठेवत नाही, असा गंभीर आरोप ज्योतिरादित्य शिंदेंनी केलाय.
#WATCH पिछले कुछ दिनों में राहुल गांधी और कांग्रेसी पार्टी ने न्यायतंत्र पर दबाव और धमकी की विचारधारा के साथ कार्य किया है। उन्होंने जिस अपनी निजी कानूनी लड़ाई को एक लोकतंत्र की कानूनी लड़ाई प्रेषित करने की कोशिश की है, उससे एक बात तो स्थापित हो चुकी है कि कांग्रेस पार्टी इस देश… pic.twitter.com/qilTn2SAPZ
— ANI_HindiNews (@AHindinews) April 5, 2023
नितीन गडकरींचाही राहुल गांधींवर निशाणा
"वीर सावरकरांचा अपमान केल्याने त्यांची उंची कमी झाली नाही, तर त्यांना घरोघरी जाण्याची संधी दिली. सत्य आणि सावरकरांना घरोघरी पोहोचवण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही राहुल गांधींचे (Rahul Gandhi) आभार मानतो. राहुल गांधींनी ते पुढे चालू ठेवावे, असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले.
फडणवीस यांनीही केला पलटवार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल गांधींवर टीका केली."राहुल गांधी म्हणतात की मी माफी मागणार नाही, ते सावरकर नाहीत. तुम्ही सावरकर किंवा गांधीही होऊ शकत नाही. सावरकर होण्यासाठी त्याग करावा लागतो. अंदमान कारागृहात त्यांना खोलीत बंदिस्त करण्यात आले होते. पूर्ण अंधार होता. त्यांना त्यांची रोजची कामेही तिथं करायला लावली होती. राहुल गांधी, एक रात्र त्या खोलीत राहण्याचा प्रयत्न करा. आम्ही तुम्हाला एसी देऊ, पण तुम्हाला राहता येणार नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल गांधींवर केली.