कॉंग्रेस स्वबळावरच; राहुल गांधी, नाना पटोले यांच्या बैठकीत निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 05:28 AM2021-07-21T05:28:43+5:302021-07-21T05:29:33+5:30
सतत वादग्रस्त विधाने करून शिवसेना, राष्ट्रवादीशी वाद ओढवून घेणारे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या ‘एकला चालो रे' या घोषणेला पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले आहे.
विकास झाडे, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सतत वादग्रस्त विधाने करून शिवसेना, राष्ट्रवादीशी वाद ओढवून घेणारे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या ‘एकला चालो रे' या घोषणेला पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले आहे.
नाना पटोले यांनी आज दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी कॉंग्रेसचे राज्य प्रभारी एच.के. पाटील, राष्ट्रीय महासचिव के. सी. वेणूगोपाल उपस्थित होते. महाराष्ट्रात संघटना वाढवणे व येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात पक्षाची भूमिका यावर चर्चा झाली.
पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यभर स्वबळावर लढविण्यात याव्यात अशी भूमिका मांडली. राहुल गांधी यांनी ही बाब मान्य केले असल्याचे पटोले यांनी सांगितले. पटोले म्हणाले, आमची संघटनात्मक मुद्दयांवर चर्चा झाली. राज्यात कॉंग्रेस विस्तारासाठी बराच वाव आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचे निश्चित केले. मात्र लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका महाविकास आघाडी सोबत मिळून लढल्या जाऊ शकतात, असे संकेत त्यांनी दिले. राज्यातील आघाडीचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल व पुढेही आघाडीचे सरकार राज्यात असेल तर केंद्रात काँग्रेसचे सरकार असेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
वाद ओढवून घेऊ नका!
- राहुल गांधी यांनी नाना पटोले यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची विनंती मान्य केली असली तरी त्यांची कान उघडणी केली असल्याचे कळते.
- महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे व आघाडी धर्माचे पालन करा, सहकारी पक्षासोबत जुळवून घ्या आणि पक्ष विस्तार करा, अशा सूचना राहुल गांधी यांनी पटोले यांना दिला असल्याचे सूत्राने सांगितले.