"राहुल गांधींच्या सुरक्षेला धोका"; भारत जोडो न्याय यात्रेबाबत खरगेंचं अमित शाह यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 11:30 AM2024-01-24T11:30:08+5:302024-01-24T11:38:45+5:30
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना याबाबत पत्र लिहिलं आहे.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान आसाममध्ये झालेल्या घटनेबाबत काँग्रेसने राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरूच ठेवला आहे. य़ाच दरम्यान आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. राहुल गांधींची सुरक्षा पुन्हा पुन्हा धोक्यात असल्याचं खरगे यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी आसाम पोलिसांवर आरोपही केले आहेत.
काँग्रेस अध्यक्षांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, मणिपूर ते मुंबई अशी 14 जानेवारीला सुरू झालेली भारत जोडो यात्रा आसाममध्ये पोहोचल्यानंतर असे काही प्रसंग आले की आसाम पोलिसांना राहुल गांधी यांच्या संरक्षण करण्यासाठी पुढे यायचं होतं, पण तसं झालं नाही. अरुणाचल प्रदेशातून काँग्रेसची यात्रा आसामच्या सोनितपूर जिल्ह्यात परतली तेव्हा तेथील स्थानिक अधीक्षक, जे सीएम सरमा यांचे बंधूही आहेत, त्यांनी काँग्रेसच्या यात्रेवर भाजपा कार्यकर्त्यांनी केलेला हल्ला प्रेक्षक म्हणून पाहिला, असा आरोप खरगे यांनी केला.
मल्लिकार्जुन खरगे असेही म्हणाले की, "भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोशल मीडिया टीम आणि पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांच्याशी झटापट केली आणि त्यांच्या गाडीवरही हल्ला केला. या लोकांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि वाहनांवरील यात्रेचे पोस्टरही फाडले."
"22 जानेवारी रोजी भाजपा कार्यकर्त्यांनी राहुल गांधींचा ताफा नागाव जिल्ह्यात अडवला, ज्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण झाली. या सर्व धक्कादायक घटनांदरम्यान, जेव्हा-जेव्हा भाजपाचे कार्यकर्ते राहुल गांधींच्या जवळ येतात तेव्हा आसाम पोलीस प्रेक्षक म्हणून पाहत राहिले, त्यामुळे काही लोक राहुल गांधींची सुरक्षा तोडण्याचा प्रयत्न करत राहिले."
अमित शाह यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून यात्रा नियोजित प्रमाणे पार पाडावी, अशी मागणी खरगे यांनी केली. राहुल गांधी किंवा भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणारा काँग्रेसचा कोणताही कार्यकर्ता जखमी झाल्यामुळे यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांचा हस्तक्षेप आवश्यक आहे, असे ते म्हणाले आहेत.