बाळासाहेबांच्या कार्यशैलीने राहुल गांधी प्रभावित...; समजून घेण्यासाठी करणार महाराष्ट्र दौरा, राऊत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 04:17 PM2021-08-03T16:17:18+5:302021-08-03T16:22:02+5:30
महाराष्ट्राच्या महा विकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेसोबत भागीदारी करणाऱ्या काँग्रेसने 2019मध्ये एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमवारी राहुल गांधी यांची भेट घेतली. राहुल यांना भेटल्यानंतर संजय राऊत म्हणाले...
नवी दिल्ला - आज राजकारणातील बदलत्या समीकरणांचे मोठे उदाहरण म्हणजे, शिवसेना आणि काँग्रेसमधील संबंध. एकेकाळी काँग्रेसचे कट्टर विरोधक असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याची माहिती घेण्यासाठी राहुल गांधी आता महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. बाळासाहेब ठाकरे कशा पद्धतीने पक्ष चालवायचे आणि इतर पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे संबंध कसे होते हे जाणून घेण्याची त्यांची इच्छा आहे.
महाराष्ट्राच्या महा विकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेसोबत भागीदारी करणाऱ्या काँग्रेसने 2019मध्ये एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमवारी राहुल गांधी यांची भेट घेतली. राहुल यांना भेटल्यानंतर संजय राऊत म्हणाले, 'बैठकीदरम्यान आम्ही अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी राहुल गांधी अत्यंत सकारात्मक आणि आत्मविश्वासात असल्याचे दिसून आले.
राहुल गांधींच्या ब्रेकफास्ट मिटिंगमध्ये शिवसेनेला मानाचं स्थान, संजय राऊतांशी साधला विशेष संवाद
बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यशैलीबद्दल जाणून घेणार आहेत राहुल -
संजय राऊत म्हणाले, राहुल गांधी यांची शिवसेनेच्या कार्यशैलीबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे. राहुल गांधींना बाळासाहेबांचा स्वभाव आणि त्यांच्या कार्यशैलीबद्दल जाणून घ्यायचे आहे. सेना प्रमुखांनी पक्ष आणि नेत्यांना कशा पद्धतीने हाताळले आणि त्याचे इतर पक्षांच्या नेत्यांशी कसे संबंध होते, हेही त्यांना जाणून घ्यायचे आहे. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल जाणून घेण्यास ते अत्यंत उत्सुक दिसत होते. एवढेच नाही, तर राहुल गांधी महाराष्ट्र दौरा आणि युतीच्या सर्व नेत्यांना भेटण्यासंदर्भातही बोलले आहेत, असेही राऊत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात युतीचे सरकार स्थापन झाल्यापासूनचा राहुल गांधींचा हा पहिलाच दौरा असेल.
इंडियन एक्सप्रेसनुसार, संजय राऊत म्हणाले, 'राहुल गांधी महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत, असे त्यांनी मला सांगितले. मात्र, ते कधी येणार हे त्यानी सांगितले नाही. काँग्रेस प्रवक्ते गोपाल तिवारी यांनी म्हटले आहे, की राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र त्यांच्या भेटीबाबत काँग्रेस मुख्यालयातून अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही. वेळ निश्चित झाल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष याची घोषणा करतील.