...म्हणून ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिला राजीनामा; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितले 'राज'कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 03:31 PM2020-03-10T15:31:59+5:302020-03-10T18:53:41+5:30
ज्योतिरादित्य शिंदे गेल्या अनेक दिवसांपासून नाराज होते. तसेच मधल्या काळात त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून काँग्रेसचं पक्षचिन्ह हटवल्याने पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा रंगली होती.
गेल्या काही महिन्यांपासून नाराज असलेले काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्ष सदस्यत्वाच राजीनामा दिल्याने मध्य प्रदेशात मोठा राजकीय भूकंप आला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी हा मोठा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनामाबाबत राज्यातील काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांना विचारले असता या राजीनाम्यानंतर काँग्रेसचं मोठं नुकसान होणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ज्योतिरादित्य शिंदे यांचा राजीनामा पक्षासाठी नक्कीच मोठा धक्का आहे. ज्योतिरादित्य शिंदेंना मध्य प्रदेश काँग्रेसचं अध्यक्ष पद हवं होतं. मात्र तसं न झाल्यामुळे त्यांच्या मनात अनेक दिवसांपासून धुसफूस सुरु होती. तसेच लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे नाराज होते. यानंतर त्यांना राज्यसभेत जाण्याची देखील इच्छा होती. परंतु तीही इच्छा पूर्ण न होऊ शकल्याने ज्योतिरादित्य शिंदे यांनी वेगळा निर्णय घेतला असल्याचे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
ज्योतिरादित्य शिंदे गेल्या अनेक दिवसांपासून नाराज होते. तसेच मधल्या काळात त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून काँग्रेसचं पक्षचिन्ह हटवल्याने पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, त्यानंतर काहीच घडलं नाही. मात्र, काल अचानक शिंदे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडं सोपवल्यानं खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्यासारखा मोहरा गेल्यामुळं काँग्रेसमध्येही चिंतेचं वातावरण आहे.
दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे नेते केसी वेणुगोपाल यांनी ज्योतिरादित्यांनी पक्ष विरोधी कारवाया केल्यामुळे पक्षाने त्यांची हकालपट्टी केल्याचे जाहीर केले. सोनिया गांधी यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हकालपट्टीवर मंजुरी दिली असून तात्काळ प्रभावाने त्यांना पक्षातून काढून टाकण्यात येत आहे, असे केसी वेणुगोपाल यांनी सांगितले.
राजीनामा नाही, काँग्रेसने हकालपट्टी केली; ज्योतिरादित्यांवर ठेवला गंभीर आरोप
आणीबाणीने कुटुंब फोडलेले, ज्योतिरादित्य सिंधिया आज जोडणार; राजमातेचे स्वप्न पूर्ण करणार
'बंडखोरी'ला मोठा इतिहास; ज्योतिरादित्यांच्या आजीनेही काँग्रेस सरकार पाडलेले