"मुलींवर अत्याचार करण्यापासून भाजप कधीच मागे हटला नाही", मध्यरात्रीच्या गदारोळावरून कॉंग्रेस आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 12:03 PM2023-05-04T12:03:32+5:302023-05-04T12:04:21+5:30
Wrestlers vs WFI : भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा धरणे आंदोलन करत आहेत.
brij Bhushan Singh । नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात पैलवानांचे अद्याप आंदोलन सुरूच आहे. आज आंदोलनाचा बारावा दिवस असून विविध राजकीय पक्ष खेळाडूंना पाठिंबा दर्शवत आहेत. आंदोलक महिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी देखील मोर्चा काढला. पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने बजरंग पुनियाने संतप्त प्रतिक्रिया दिली होती. रात्री उशीरा दिल्ली पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यात महिला कुस्तीपटूंना शिवीगाळ केल्याचा आरोपही या खेळाडूंनी केला आहे.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. पण आंदोलक त्यांच्या राजीनाम्यावर ठाम असून अटकेची मागणी करत आहेत. आता या आंदोलनात कॉंग्रेसने उडी घेतली असून प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
"देशातील खेळाडूंसोबत असे वागणे अत्यंत लज्जास्पद आहे. 'बेटी बचाओ' हा निव्वळ ढोंगीपणा आहे. किंबहुना भारतातील मुलींवर अत्याचार करण्यापासून भाजप कधीच मागे हटला नाही", अशा शब्दांत खासदार राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षावर बोचरी टीका केली.
देश के खिलाड़ियों के साथ ऐसा बर्ताव बहुत ही शर्मनाक है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 4, 2023
‘बेटी बचाओ' बस ढोंग है! असल में भाजपा भारत की बेटियों पर अत्याचार करने से कभी पीछे नहीं हटी है। pic.twitter.com/TRgPyM8UbF
कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी देखील या आंदोलनावरून सरकारला धारेवर धरले आहे." आपल्या परिश्रमाने आणि समर्पणाने देशाचे आणि कुटुंबाचे नाव उंचावणाऱ्या महिला खेळाडूंचे अश्रू पाहून खूप वाईट वाटते. त्यांची सुनावणी होऊन लवकर न्याय द्यावा", अशी मागणी प्रियंका यांनी केली आहे.
अपनी कड़ी मेहनत और लगन से देश व अपने परिवार का नाम रोशन करने वाली महिला खिलाड़ियों के आंसू देखकर बहुत दुख होता है।
इनकी सुनवाई हो और न्याय दिया जाए। pic.twitter.com/ofZwrd7m3R— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) May 4, 2023
आखाड्याबाहेरील 'कुस्ती' सुरूच
लक्षणीय बाब म्हणजे ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांसह देशातील ७ नामांकित पैलवानांनी मागील रविवारी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आज गुरूवारी आंदोलनाला बारा दिवस पूर्ण झाले असून भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आहेत. प्रशिक्षक महिलांचा छळ करत आहेत आणि फेडरेशनचे काही जवळचे लोक प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांशीही गैरवर्तन करतात. ते मुलींचा लैंगिक छळ करतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षांनी अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे, असे गंभीर आरोप महिला पैलवानांनी केले आहेत. खरं तर ब्रिजभूषण यांनी केलेल्या दाव्यानुसार आता केवळ तीन पैलवान आंदोलनस्थळी आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"