"महात्मा गांधींच्या आजूबाजूला महिला दिसायच्या, मोहन भागवत यांच्यासोबत का नाही?"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 07:56 PM2021-09-15T19:56:20+5:302021-09-15T19:58:53+5:30
"त्यांची (मोहन भागवत) संघटना आरएसएस महिला शक्तीला दाबण्याचे काम करत. तर, काँग्रेस संघटना महिलांना पुढे जाण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते."
नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. भाजप आणि संघ महिलांना पुढे येऊ देत नाही, असा घणाघाती आरोप त्यांनी केला. याच वेळी त्यांनी, महात्मा गांधी यांच्या फोटोमध्ये साधारणपणे 2-3 महिला दिसतात. पण, मोहन भागवत यांच्या फोटोत महिला का दिसत नाहीत? असा सवालही राहुल गांधी यांनी केला आहे. (Congress leader Rahul Gandhi ask Mahatma Gandhi seen with women around him why Mohan Bhagwat not)
राहुल गांधी म्हणाले, त्यांची (मोहन भागवत) संघटना आरएसएस महिला शक्तीला दाबण्याचे काम करत. तर, काँग्रेस संघटना महिलांना पुढे जाण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते. राहुल गांधी म्हणाले, आरएसएसने आजपर्यंत कोणत्याही महिलेला पंतप्रधान केले नाही. मात्र, काँग्रेसने एका महिलेला देशाचे पंतप्रधान बनवले होते. भाजप सरकारने लक्ष्मी आणि शक्तीला घरातून बाहेर काढले आहे. सरकारने असे धोरण लागू केले आहे, की आज लोकांकडे पैसे नाहीत. नोटाबंदी, जीएसटी आणि कृषी कायदे, यांसारखी समाजविरोधी धोरणे राबवून, या सरकारने लक्ष्मीची संपूर्ण शक्ती आपल्या चार-पाच लोकांच्या हाती सोपविली आहे.
हातात बॅग घेऊन पंतप्रधान 'मोदी' ट्रेननं कुठे निघाले...? आपणही फसलात ना...?
महिला काँग्रेसच्या स्थापना दिन कार्यक्रमात राहुल गांधी म्हणाले, "जेव्हा आपण महात्मा गांधींचा फोटो पहता, तेव्हा आपल्याला त्यांच्या आजूबाजूला 2-3 महिला दिसतील. याउलट, आपण कधी मोहन भागवत यांचा एखाद्या महिलेसोबत फोटो पाहिला आहे? कारण त्यांची संघटना महिलांना दडपण्याचे काम करत आणि आमचा पक्ष त्यांना व्यासपीठ देते," असे राहुल गांधी म्हणाले.
देशावरील दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती यांचा आशीर्वाद कमी झाला आहे -
तत्पूर्वी, माता वैष्णो देवीचे दर्शन घेतल्यानंतर, राहुल गांधी यांनी जम्मूच्या त्रिकुटा नगर येथे कार्यकर्त्यांना आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केली होती. तेव्हा ते म्हणाले होते, देशावरील दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती यांचा आशीर्वाद कमी झाला आहे. "काल मी मंदिरात (वैष्णो देवी) गेलो होतो, तेथे मला तीन देवी दिसल्या. दुर्गाजी, लक्ष्मीजी आणि सरस्वतीजी. दुर्गा हा शब्द 'दुर्ग' या शब्दापासून बनला आहे आणि देवी दुर्गा म्हणजे संरक्षण करणारी शक्ती आहे. देवी लक्ष्मी ही एक अशी शक्ती आहे, जी एखादे ध्येय साध्य करण्यास मदत करते. तर देवी सरस्वती शिक्षण आणि ज्ञानाची शक्ती आहे. जेव्हा देशात या तीनही शक्ती असतात तेव्हा देश समृद्ध होतो.''